The layers of human life are revealed through stories

कथांमधून उलगडतात मानवी जीवनाचे पदर-प्रा. मिलिंद जोशी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : “उत्तम निरीक्षण, विपुल शब्दसंग्रह व अनुभवविश्व समृद्ध असेल, तर वाचनीय साहित्याची निर्मिती होते. अनुभवांतून उतरलेल्या कथांमधून मानवी जीवनाचे पदर उलगडतात. लघुकथासंग्रह अल्पाक्षरी असला, तरी अर्थबहुल असल्याने यातील कथा, मानवी जीवनाचे दर्शन घडवितात,” असे मत लेखक व वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी व्यक्त केले. (The layers of human life are revealed through stories)

लेखिका उर्मिला घाणेकर(Urmila Ghanekar) लिखित कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित ‘निमिष'(Nimish) या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका व पर्यावरण संरक्षक चित्कला कुलकर्णी, उर्मिला घाणेकर, संयोजक अमेय घाणेकर आदी उपस्थित होते.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “कथासंग्रह लिहिताना कला व कथा द्रव्य असावे लागते. माणसांची विण जपण्याचा स्वभाव असलेल्या उर्मिला घाणेकर यांच्या ‘निमिष’ कथासंग्रहात त्यांना जगताना आलेले अनुभव चितारले आहेत. नात्यांमध्ये होणारे पेच, गुंतागुंत आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याचा बोध या कथांतून मिळतो. हरवलेले संवाद, दुभंगलेली नाती, तुटलेली मने या संग्रहात दिसतात. लेखक स्वत:च्या नजरेने समाजाकडे व समाजाच्या नजरेने स्वतःकडे पाहत असतो. त्यातून निर्माण झालेले साहित्य वाचकाला भुरळ घालते. तंत्रज्ञानाचा उपयोग साहित्य प्रसारासाठी करावा. मात्र, त्याच्या आहारी जाता कामा नये. स्वातंत्र्य अणि स्वैराचार यात गल्लत न करता स्वच्छंदी आयुष्य जगायला हवे.”

‘निमिष’ हा माझा दुसरा लघुकथासंग्रह आहे. यापूर्वीच्या ‘तलग’ लघुकथासंग्रहाला प्रतिसाद मिळाल्याने माझ्या मनात राहिलेल्या अनेक गोष्टी ‘निमिष’मधून मांडल्या आहेत. ‘चमत्कार’, ‘अनुश्री’, ‘गैरसमज’, ‘पाणी पुण्याचे’, ‘काकासाहेब’ अशा वाचनीय लघुकथा या पुस्तकात आहेत. पतीच्या नोकरीनिमित्त विविध ठिकाणी राहताना अनेक माणसे भेटली. अनुभव आले. त्यातून सुचलेल्या या कथा आहेत, अशा शब्दांत उर्मिला घाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

चित्कला कुलकर्णी म्हणाल्या, “निसर्ग अभ्यासण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन काम करत आहे. बीज बँक करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सहज व सोप्या भाषेत गोष्ट सांगण्याची हातोटी उर्मिला घाणेकर यांच्या या पुस्तकात दिसते. पुराण वाङ्मयाकडे डोळसपणे पाहायला हवे. वाचन संस्कृती कमी झाली असली, तरी मुलांमध्ये लेखन, वाचनाची गोडी टिकून आहे. साहित्य अधिक व्यापक व लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडिया, ब्लॉग, वेबसाइट यांसारखी नवमाध्यमे हाताळायला पाहिजेत.”

माधवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अमेय घाणेकर यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *