पुणे- हिंदू धर्मात आणि मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच महत्त्वाच्या दिवशी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला पुणेकरांनी विणलेले वस्त्र घालून सजविण्यात आले होते. पुणेकरांसाठी ही अभिमानाची आणि कृतार्थतेची भावना असून यानिमित्ताने पुणेकरांच्या आस्थेचा योग्य सन्मान झाला असल्याच्या भावना पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी व्यक्त केल्या.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने १० ते २२ डिसेंबर या कालावधीत पुण्यात ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पुणेकरांनी फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी येऊन हातमागावर आपल्या लाडक्या रामलल्लासाठी श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे विणले होते. या दरम्यान तब्बल १२ लाख ३६ हजार नागरीकांनी या उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतला. याशिवाय अनेक मान्यवर व्यक्तींनी देखील उपक्रमाला भेट देत शुभेच्छा देत आपला पाठींबा दर्शविला होता.
याविषयी अधिक माहिती देताना अनघा घैसास म्हणाल्या, “काल झालेल्या गुढीपाडव्यानिमित्त पुणेकरांनी विणलेल्या या धाग्यांपासून तयार करण्या आलेले वस्त्र रामलल्लाला प्रात: समयी गुढी उभारताना घालण्यात आले. यावेळी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांची उपस्थिती होती. त्यांनी स्वत: रामलल्लाचा वस्त्र परिधान केलेला फोटो पाठवीत ही माहिती मला दिली. कालचा दिवस हा खरेतर या उपक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला. इतर वेळी रामलल्लाचे वस्त्र दुपारच्या वेळेत बदलले जाते मात्र काल पुणेकरांनी विणलेल्या धाग्याचे हे वस्त्र पूर्णवेळ मूर्तीला घालण्यात आले इतकेच नव्हे तर वस्त्राच्या शैलीमध्येही यावेळी बदल करण्यात आला होता. यामुळे लाखो पुणेकरांच्या भावना आणि श्रद्धेचा योग्य सन्मान झाला आहे, असे मला वाटते.”