ऑन डय़ुटी पोलिसाला कंटेनरने चिरडले : वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार

ऑन डय़ुटी पोलिसाला कंटेनरने चिरडले
ऑन डय़ुटी पोलिसाला कंटेनरने चिरडले

पुणे(प्रतिनिधी)-  पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव तळेगाव फाटा चौकात कर्तव्यावर असणाऱया एका वाहतूक पोलिसाला भरधाव कंटेनरने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. यामुळे वडगाव मावळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिथुन वसंत धेंडे (वय ४९ रा. उरुळी कांचन, पुणे, सध्या वडगाव पोलीस स्टेशन ता.मावळ जि.पुणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बाजूकडून चाकणकडे जाणाऱया भरधाव कंटेनर चालकाने वाहतूक नियमन करणाऱया वाहतूक पोलिसाला चिरडले. यात वाहतूक पोलीस मिथुन धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक चाकण बाजूला वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक भरधाव वाहन चालवत असतानाचा व्हिडिओ एका तरुणाने काढला व त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीण कंट्रोलवरून कंटेनर थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याने कंटेनर थांबवत असताना भरभाव वेगात त्याने वाहतूक पोलीस धेंडे यांना चिरडले. या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

अधिक वाचा  मंडई गणपतीचे २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून चोर पसार

दरम्यान, १४ मे रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. या अपघाती निधनाने वडगाव मावळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक नियमन करणाऱया वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित कंटेनर चालकास लवकरात लवकर पकडून कठोरातील कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी परिसरात होत आहे.

वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार

मिथुन धेंडे यांचा बुधवारी (१४ मे) वाढदिवस होता. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्यांच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते. मात्र, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्यावर काळाने घाला घातला. वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. धेंडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी उरुळी कांचन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love