न्यू इंग्लिश स्कूलचे तारांगण झाले अधिक स्मार्ट : आधुनिक दुर्बिणींमुळे खगोलशास्त्राचा अभ्यास होणार ऑनलाइन


पुणे -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या ६७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या तारांगणात दोन आधुनिक दुर्बिणींच्या समावेश झाल्याने ते अधिक स्मार्ट झाले असून, आता खगोलशास्त्राचा ऑनलाइन अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अँण्ड ट्रेनिंग इनस्टिट्यूटच्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने या तारांगणात खगोलशास्त्राचे अभ्यासक्रम शिकविले जातात. आधुनिक दुर्बिणींमुळे ऑनलाइन अभ्यासाबरोबर अस्ट्रोफोटोग्राफी हा विषय सोप्या पद्धतीने शिकता येणार आहे. यासाठी डीएसएलआर कॅमेऱ्यामध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या तरंगलांबीसाठी तो वापरता येणार आहे. विशेषत: हायड्रोजन अल्फासाठी उपयुक्त ठरणार आहे. तेजोमेघाचे खरे रंग आणि आकाशगंगेच्या रचनेची छायाचित्रे मिळू शकणार आहेत.

दुसऱ्या दुर्बिणीला कोणताही स्मार्ट फोन वायरलेस जोडता येणार असून, आकाशातील तारे, ग्रह, तेजोमेघ, आकाशगंगा यांचे निरीक्षण करता येणार आहे. या दुर्बिणीच्या भिंगाचा व्यास ८० मिलिमीटरअसून नाभीय अंतर ५० सेंटीमीटर आहे. या दुर्बिणीचे मुख्य भिंग तीन भिंगांनी तयार केलेले आहे. त्यामुळे प्रकाशाचे कमीत कमी विकिरण होणार आहे. त्यामुळे शंभर टक्के अचूक प्रतिमा मिळणार आहेत. यामध्ये काचेचे कोणतेही दोष शिल्लक राहत नसल्याने, आकाशाचा खूप मोठा भाग बघता येणार आहे. दोन्ही दुर्बिणी स्वयंचलित  असून तारे, ग्रह यांच्या वेगाने फिरू शकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना निरीक्षणात्मक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करता येणार आहे.

अधिक वाचा  गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी : गणेश मंडळांची मागणी

रमणबाग शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक प्रमोद चौधरी यांनी संस्थेला दिलेल्या देणगीतून नुकत्याच दुर्बिणी खरेदी करून तारांगणाला सुपूर्द करण्यात आल्या. शालेय स्तरावर खगोलशास्त्र विषय शिकविण्याची गरज आहे. तरच निरीक्षणात्मक माहिती संकलन आणि विश्लेषण करणारे विद्यार्थी तयार होतील असे मत शास्त्रज्ञ पराग महाजनी यांनी यावेळी व्यक्त केले. डीईसचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, माध्यमिक शाळा समन्वय समितीच्या अध्यक्षा स्वाती जोगळेकर, आजीव सदस्या प्राजक्ता प्रधान, तारांगण प्रमुख विनायक रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love