पुणे- केंद्रात जसे एक पप्पू आहे, त्याप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. उठसुठ ते काहीही आरोप करत असतात, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.
शुक्रवारी पटोले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना डबे नाही तर इंजिन बदलण्याची गरज असल्याची टिका केली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी पटोले यांच्यावर पलटवार करत ते महाराष्ट्राचे पप्पू असल्याची टिका केली आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार हे हिमनगाचे टोक आहे. मी जे पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिले आहे. त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 वर्षांपूर्वीच दिलेल्या यादीचाही समावेश आहे. मी राज्यातील साखर कारखान्यांची यादी पाठवल्याने शहा यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी दिली, असे नाही. तर किमान वर्षभरापूर्वी या जबाबदारीचे नियोजन झाले होते. आता देशातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल, असेही पाटील म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी साखर कारखानदारी वाचवली आहे. त्यांनी साखरेला हमी भाव ठरवून दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी खुश असल्याचे पाटील यांनी सांगितले.
गडकरींच्या कारखान्यात गैरव्यवहार झालेला नाही
अण्णा हजारे यांच्या यादीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दोन साखर कारखान्यांची नावे असल्याच्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी गडकरी यांच्या साखर कारखान्यांमध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
संजय राऊत यांना सहकारातील काय कळतं?
केंद्राकडे सहकार विभाग गेल्याने लोकशाहीला धोका आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. याबाबत बोलताना, राऊत यांना सहकारातील काय कळते? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केल. एक सहकारी साखर कारखाना किती भाग धारकांवर तयार होतो, हे माहिती आहे का ? त्यांनी अगोदर अभ्यास करावा, मग सहकारावर बोलावे असा टोलाही त्यांनी लगावला.