पैलवान तरुणाचा भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून


पुणे– पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील (जि. पुणे) शेलपिंपळगाव येथे एका पैलवान तरुणाचा भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

नागेश सुभाष कराळे (३७, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (एम एच १४ जे जे १३२३) क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या थार मोटारीत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर फोर्ड फिगो कंपनीच्या ( क्र. ६१८३) वाहनातून आलेले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर याच्यासह इतर तीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  #Pune Public Policy Festival : शैक्षणिक पदवीपेक्षा धोरणांचा समाजाला आणि देशाला होणारा उपयोग समजून घेणे जास्त महत्त्वाचे

नागेश कराळे हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील रस्त्यालगत आपल्या मोटारीत बसत असताना लगतचा दबा धरून बसलेले हल्लेखोर अचानक एका मोटारीतून आले. मारेकऱ्यांनी त्यांना भर रस्त्यात गाठले. त्यांच्यावर पिस्तुलातून एकापाठोपाठ गोळ्या झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. यात गंभीररित्या जखमी झालेला कराळे यास तत्काळ चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

नागेश यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं चाकण पोलिसांनी सांगितले आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नागेश हे मिलिंद बिअर शॉपी येथून मोटारीतून घरी जात होते. ते मोटारीत बसताच अचानक दुसऱ्या मोटारीमधून आलेल्या दोघांनी बेसावध नागेश यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्या असून त्यांचा मृत्यू झाला आहे. नागेश हे पैलवान होते. गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा मोटारीत असल्याने त्यांना हल्लखोरांचा प्रतिकार करता आला नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love