पुणे(प्रतिनिधि)—हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे मंगळवारी (दि.१३ मे) नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार निकोबार बेटांवर मागील २४ तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ६ जून रोजी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
देशभरात गेल्या पन्नास दिवसांपासून सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावरही होणीर अशी चिन्हं दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, मान्सून यंदा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता असून १३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केला होता. त्याप्रमाणे मंगळवारी मॉन्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. .
६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
दरम्यान, येत्या ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. २७ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून ६ जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या ५ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.
राज्यभरात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (दि. १३) मुंबई, पुणे तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. मुंबईसाठी आज आणि उद्या पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणासाठीही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून अहिल्यानगरसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील घाट भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने बुधवार १४ मे आणि गुरुवार १५ मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील आकाश ढगांनी आच्छादलेले राहील. बुधवारी आणि गुरुवारी काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.