पुणे- देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. रात्री त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महायुतीच्या नेत्यांशी सह्याद्रीवर चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, अमित शाह यांचा जागावाटप संदर्भातील मुंबईतील चर्चेचा फेरा संपल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते आज( बुधवार दि. ६ मार्च) रवाना झाले आहेत. अमित शहांच्या कालच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांची संभाव्य यादीची जोरदार चर्चा सुरू झाली असून पुण्यामध्ये उमेदवारीसाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचेच नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेचे वारे वाहायला लागल्यापासून पुण्यामध्ये भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार संजय काकडे, शिवाजीराव मानकर, पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या राज्यातील लोकसभा मतदार संघासाठीच्या उमेदवारांची संभाव्य यादीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचेच नाव अग्रेसर असल्याचे सांगितले जात आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी सांभाळलेल्या संघटनात्मक पातळीवरील जबाबदऱ्या, महापौर असताना कोरोना काळात केलेलं काम, जनतेतला चेहरा, दांडगा जनसंपर्क, विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, क्षेत्रातील भव्यदिव्य कार्यक्रमातून गेल्या वर्षभर संपूर्ण मतदारसंघात केलेला जनसंपर्क, त्यातून निर्माण झालेली त्यांची मिनी खासदार म्हणून प्रतिमा आणि निवडून येण्याची क्षमता या त्यांच्या इतरांच्या तुलनेत प्रभावी बाजू आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षाने विचार केल्याचे बोलले जात असून आता महाराष्ट्राची यादी पक्ष कधी जाहीर करणार यांची उत्सुकता सर्वांना लागली आहे.