पुण्यातील सरगम चाळीजवळ ‘कोयता गँग’चा उच्छाद : वाहनांची तोडफोड : रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यातील सरगम चाळीजवळ 'कोयता गँग'चा उच्छाद : वाहनांची तोडफोड
पुण्यातील सरगम चाळीजवळ 'कोयता गँग'चा उच्छाद : वाहनांची तोडफोड

पुणे(प्रतिनिधि)– शहरातील सरगम चाळीजवळच्या परिसरात पुन्हा एकदा ‘कोयता गँग’ने दहशत निर्माण केली असल्याची घटना समोर आली आहे. हातात कोयते, कुऱ्हाडी आणि लांब सुऱ्यांसारखी शस्त्रे घेऊन आलेल्या सुमारे १० ते १५ तरुणांच्या टोळक्याने परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे टोळके  सरगम चाळीकडून पळत आले. त्यांच्या हातात कुऱ्हाडी होत्या, कोयते होते. त्यांनी दगडफेकही केली. ते ओरडत ठोके मारीत सर्वत्र फिरत होते. या हल्ल्यात परिसरातील अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दोन-तीन गाड्या फोडल्या गेल्या. तसेच, दोन-तीन रिक्षांचीही तोडफोड करण्यात आली.घटनेच्या वेळी परिसरात महिला आणि लहान मुले उपस्थित होती.

अधिक वाचा  चित्रपटात काम देण्याचे आमिष; फोटो एडिटिंग करून केली शरीर संबंधाची मागणी, फोटो व्हायरल करण्याची धमकी

घाबरलेल्या रहिवाशांनी या घटनेचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ घेऊन आणि घडलेला प्रकार सांगण्यासाठी ते पोलिसांकडे गेले. रहिवाशांनी पोलिसांना व्हिडिओ दाखवला. मात्र, पोलिसांच्या प्रतिसादाबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी त्यांना व्हिडिओ ‘व्हायरल’ करू नका असे सांगितले. इतकेच नव्हे तर, तुमच्यावर कारवाई होईल असा इशाराही पोलिसांनी दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.

आमच्या गाड्या फोडल्या आहेत, लेकरांना दगड लागले आहेत, हे सांगूनही आणि पोलीस चौकीच्या दारात बसूनही, पोलिसांनी काहीच केले नाही, असे एका महिला रहिवाशाने सांगितले. पोलिसांनी केवळ ‘पोलिस चौकीत या’ असे सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसांनी या प्रकरणी कोणाला अटक केली आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नाही, असेही ते म्हणाले.

लहान मुलांच्या सुरक्षेबाबत रहिवाशांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जर एखादे लहान मूल तिथे असते, तर काय झाले असते, असा प्रश्न त्यांनी विचारला. व्हिडिओ दाखवूनही पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही, अशी भावना रहिवाशांमध्ये आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love