Sharad Pawar –तुम्ही कोणामुळे आमदार झालात, फॉर्मवर अध्यक्ष या नात्याने कुणी सही केली होती, हे विसरू नका. सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये, यासाठी दम देणे, हे योग्य नाही. एकदा दम दिलात, बस्स. पुन्हा असे कराल, तर मलाही शरद पवार म्हणतात, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना गुरुवारी येथे दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा लोणावळय़ात पार पडला. या वेळी लोणावळा राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील ३३३ जणांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. मेळाव्याला माजी राज्यमंत्री मदनशेठ बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्ये÷ नेते प्रकाश म्हस्के, माजी महापौर संजोग वाघिरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, ज्ये÷ नेते रमेश नय्यर, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांचा कठोर शब्दात समाचार घेतला. तुझ्या सभेला कोण आले होते, त्यावेळी पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता, तुझ्या फॉर्म व चिन्हासाठी नेत्यांची सही लागते. ती माझी आहे. तुला आमदार कोणी केला? ज्या पक्षाचे कार्यकर्ते तुला निवडून आणायसाठी राबले, त्यांनाच तू माझ्या सभेला जाऊ नका, असे धमकावतोस. माझी विनंती आहे, एकदा दम दिला आता बस्स. पुन्हा माझ्या वाटय़ाला गेलास, तर मीसुद्धा शरद पवार आहे, हे विसरू नकोस, अशा शब्दात पवार यांनी शेळके यांना फटकारले.
भाजपावरही पवार यांनी निशाणा साधला. भाजपा ही आज एक वॉशिंग मशीन झाली आहे. ज्यांच्यावर आरोप झाले असतील, त्यांना पक्षात घ्यायचे व स्वच्छ करायचे असा प्रकार सुरू आहे. आदर्श घोटाळा व राज्य सहकारी बँक घोटाळा याचे आरोप ज्यांच्यावर झाले, त्यातील एक आज भाजपवासी झाले, तर दुसऱयाशी युती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या जाहिराती वा मोदी गॅरंटी देत आहेत, ती जनतेच्या पैशातूनच देण्यात येत आहे. मात्र, शेतकरी आंदोलन वा जनतेच्या प्रश्नांशी त्यांना देणेघेणे नाही. मोदी सरकारच्या कारभारामुळे देशातील लोकशाही संकटात आली आहे. एकीकडे गांधींचे नाव घ्यायचे व दुसरीकडे नेहरुंना शिव्या घालायच्या असे प्रकार सुरू आहेत, अशी टीका पवार यांनी केली.