Amol Kolhe –‘मी जर घोड्यावर बसलो की, काही जणांच्या पोटात लय दुखतंय’ अशा शब्दात शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी नाव न घेता विरोधकांना जोरदार टोला लगाविला. कोणी कितीही टीका करू द्या, लोकसभा निवडणुकीत विकासाची कामे करणाऱ्यांच्या पाठीशी रहा, असे आवाहनही खासदार कोल्हे यांनी मतदारांना केले.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यास सुरूवात केली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या जुन्नर विधासभा मतदारसंघातील पारगाव तर्फे आळे या गावात डॉ. कोल्हे यांनी आपला प्रचार केला. त्यावेळी ग्रामस्थांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. निमगाव सावा, साकोरी त्यांनतर पारगाव तर्फे आळे या गावात डॉ.कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता यावेळी पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात फुलांची उधळण करत स्वागत केले. प्रचारासाठी आलेल्या खासदार डॉ.कोल्हे यांना घोड्यावर बसण्याची विनंती ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांनी केलेल्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉ.कोल्हे घोड्यावर बसले. त्यावेळी यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माऊली खंडागळे, भास्कर गाडगे यांना देखील ग्रामस्थांनी घोड्यावर बसवत ग्रामस्थांनी त्यांची गावातून मिरवणूक काढली. त्यानंतर ग्रामस्थांनी संवाद साधला.’मी जर घोड्यावर बसलो की, काही जणांच्या पोटात लय दुखतंय’ अशा शब्दात त्यांनी नाव न घेता विरोधकांना जोरदार टोला लगाविला. यापूर्वी कोल्हे यांनी २०१९ साली लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आश्वासन दिले होते की, ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार आणि तो शब्द अमोल कोल्हे यांनी पूर्ण केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील मानाच्या यात्रेत बैलगाडा घाटात बैलगाड्यासमोर घोडी धरली होती त्यानंतर आज पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.