होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता – ऍड. उज्ज्वल निकम

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी  : “ऍलोपॅथी-होमिओपॅथी हा वाद, त्यातील मतमतांतरे जुना विषय आहे. पण होमिओपॅथीने अनेक चमत्कार घडवल्याचे पहिले आहे. ही पॅथी अनेक आजारांवर गुणकारी आहे. ऍलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरीत परिणाम होतात. होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणत्याही ऑपरेशन किंवा इंजेक्शन शिवाय केवळ पांढऱ्या गोळ्या प्रभावी ठरतात. त्यामुळे होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी केले.

मिशन होमिओपॅथी व आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथस् गाईड टू कोविड-१९’ या पुस्तकाचा प्रकाशन व ‘होमिओपॅथीक कोविड हिरो’ सन्मान सोहळ्यात ऍड. निकम बोलत होते. रावेत येथील हॉटेल ब्लू वॉटर येथे झालेल्या सोहळ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम, डॉ. जसवंत पाटील, अजय कौल, ऍड. आसावरी जगदाळे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते.

ऍड. उज्ज्वल निकम म्हणाले, “कोणतेही सेवा देताना नीतिमूल्यांची जाणीव आणि सखोल अभ्यास हवा. डॉ. निकम या दोन्ही गोष्टींचा अवलंब करत होमिओपॅथीला सर्वमान्य होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर आनंदाबरोबच संकटाचाही सामना करण्याची क्षमता आपल्यात असावी. निगर्वी, प्रामाणिक वागण्यातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न हवा.”

डॉ. अमरसिंह निकम म्हणाले, “कोविडसारखे व्हायरस येतील आणि जातीलही; पण होमिओपॅथी आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. हजारो आजारांवर होमिओपॅथी उपचार अत्यंत प्रभावी आहेत. शहरी, ग्रामीण भागात सर्वसामान्यांना परवडेल, अशा स्वरूपाची ही उपचारपद्धती आहे. यामध्ये ऑपरेशन नाही की इंजेक्शन नाही. केवळ गोळ्यांनी आजार बरा करण्याची क्षमता आहे. होमिओपॅथीकडे अनेकजण शेवटचा पर्याय म्हणून पाहतात. पण होमिओपॅथी सर्व आजारांवर उपचार देणारी पद्धती आहे. कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीनीही होमिओपॅथी औषधांबाबत सकारात्मकता दाखवली. त्यामुळे राज्यभरात ही औषधे मोफत देता आली. प्रतिबंधक औषध म्हणून त्याचा चांगला उपयोग झाला.”

श्रीरंग बारणे म्हणाले, “वैद्यकीय सेवेत मोठ्या प्रमाणात व्यवसायिकरण झालेले असताना डॉ. निकम व परिवार सातत्याने चांगले काम करत आहेत. पुस्तक रूपाने आपले अनुभव लोकांपर्यंत जायला हवेत. डॉ. निकम लिखित हे पुस्तक नवोदित डॉक्टरांना मार्गदर्शक ठरेल. शंभर खाटांचे होमिओपॅथी रुग्णालय उभारण्याचे धाडस डॉ. निकम यांनी केले आहे.”

प्रसाद लाड म्हणाले, “होमिओपॅथी देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न डॉ. निकम यांनी केला. त्यांनी केलेले संशोधन होमिओपॅथीच्या प्रचार व प्रसारासाठी उपयुक्त ठरेल. सर्वसामान्य, गोरगरीब लोकांना कोविड काळात दिलासा देण्याचे काम डॉ. निकम यांच्या माध्यमातून करू शकलो. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री मिळायला हवी.”

कृष्ण प्रकाश म्हणाले, “आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. होमिओपॅथीमध्ये शरीरावर कोणतेही विपरीत परिणाम न होता आजार बरा करण्याची क्षमता आहे. संशोधन आणि सेवा याची सांगड घालत डॉ. निकम यांनी होमिओपॅथीला वेगळी ओळख दिली आहे.”

डॉ. जसवंत पाटील म्हणाले, “स्वानुभवातून होमिओपॅथी अंगिकारली. अनेक प्रसंगांमुळे होमिओपॅथीचा प्रभाव दिसला. कोविड काळात होमिओपॅथीचा चांगला उपयोग झाला. उपचारांमध्ये होमिओपॅथीची जोड दिली तर अनेक जीव वाचतील.”

ऍड. आसावरी जगदाळे यांनी आपल्या मनोगतात होमिओपॅथीमुळे पाठदुखीतून मुक्त झाल्याचा अनुभव सांगितला. सूत्रसंचालन मिशन होमिओपॅथीचे डॉ. निलेश जंगले व आशिष चौबे यांनी केले. आभार डॉ. सुचित्रा निकम यांनी मानले.

राजकारण्यांना होमिओपॅथीच्या गोळ्या द्याव्यात

होमिओपॅथी शारीरिक, मानसिक आजारांवर प्रभावी ठरते. महाराष्ट्राच्या राजकारण, तसेच सध्याची राजकीय भाषा पाहता, द्वेषाचा रोग लागल्याचे दिसते. त्यावर उपचारासाठी होमिओपॅथीने पुढाकार घ्यायला हरकत नाही. होमिओपॅथी तज्ज्ञांनी अशा परिणामकारक गोळ्या राजकारण्यांसाठीही तयार कराव्यात, जेणेकरून त्यांच्या तोंडून शिवराळ भाषा येणार नाही आणि श्रोत्यांना ऐकायला आनंद वाटेल. माझ्या जिल्ह्यातील राजकीय लोकांना हे स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. पोलीस खात्याची प्रतिमा ढासळली असताना कृष्ण प्रकाश यांच्यासारखे अधिकारी नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करतात ही बाब आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.

उज्ज्वल निकमांनी ज्यांचे वकीलपत्र घेतले…

डॉ. अमरसिंह निकम यांच्या होमिओपॅथीतील संशोधन व कार्याबद्दल त्यांना पद्मश्री मिळायला हवी आणि त्यासाठी ऍड. उज्ज्वल निकम यांनी पुढाकार घ्यावा, असे विधान आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्यावर मिश्किल टिपण्णी करत ऍड. निकम म्हणाले, “ज्यांचे वकीलपत्र उज्ज्वल निकम घेतात, त्यांना यश मिळाल्याशिवाय राहत नाही, यावर विश्वास आहे. माझा जन्म हनुमान जयंतीचा असल्याने कोणते उड्डाण कोठे घ्यायचे याचा अंदाज आहे. डॉ. निकम यांच्या ‘पद्मश्री’ची केस लवकरच मार्गी लागेल.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *