1977 पासून पवारांचा विलीनीकरणाचा इतिहास – चंद्रशेखर बावनकुळे

History of mergers of Pawar since 1977
History of mergers of Pawar since 1977

पुणे(प्रतिनिधि)–कधी बाहेर पडायचे, तर कधी विलीन व्हायचे, हा शरद पवार यांचा 1977 पासूनचा इतिहास आहे. आता त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच त्यांनी विलीनीकरणाची भाषा सुरू केली आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बुधवारी निशाणा साधला. 

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पपत्राचे प्रकाशन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

नजिकच्या काळात अनेक पक्ष काँगेसच्या जवळ येतील किंवा पक्षात विलीन होतील, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. त्याचा धागा पकडून बावनकुळे म्हणाले, पवारांकडे कदाचित दुसरा पर्यायच नसावा. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार, याची आता त्यांना जाणीव आली आहे. त्यामुळेच लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. पवारांचा राष्ट्रवादीही यात असेल, हेच त्यांना सांगायचे असावे. मुळात विलीनीकरण पवारांसाठी नवीन नाही. कधी बाहेर पडायचे, तर कधी पुन्हा त्या पक्षात विलीन व्हायचे, हा पवार यांचा 1977 पासूनचा इतिहास आहे. त्यांच्या विजयाच्या आशा संपल्या आहेत. त्यामुळे वेगळे काही होणार नाही. 

अधिक वाचा  न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते- कोणाला म्हणाले अजित पवार?

निवडणुकीतील पैसे वाटपाचे आरोप व बारामतीतील 150 तक्रारींकडे लक्ष वेधले असता बावनकुळे म्हणाले, 55 वर्षे काँग्रेसने केवळ पैशाचे उद्योग केले आहेत. म्हणूनचा आज त्यांच्याकडून असे खोटे आरोप होत आहेत. मुळात हा केवळ नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याकडून असा फॉरमॅट तयार करण्यात आला व त्यावर काम झाले.  

 पराभव दिसू लागल्याने राऊतांचे आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटी रुपये घेऊन छत्रपती शाहू महाराजांना पाडण्याचा डाव आखला होता, या संजय राऊत यांच्या आरोपांबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, आरोप करणे, हे विरोधकांचे कामच आहे. विरोधकांच्या या रडगाण्याला अर्थ नाही. आता ईव्हीएमबद्दलही त्यांचे आरोप सुरू होतील. पराभव दिसू लागल्यानेच अशा प्रकारचे आरोप होत आहेत. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताला साथ दिली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना दु:ख झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love