पुणे(प्रतिनिधि)–महायुती सरकारच्या प्रयत्नातून लंडन येथील व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट वस्तूसंग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे ही महाराष्ट्रात दाखल झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ती साताऱ्यात ठेवण्यात येणार आहेत. ही ऐतिहासिक वाघनखे तमाम शिवप्रेमीच्या दर्शनासाठी पुण्यनगरीत ठेवण्यात यावी अशी विनंती वजा मागणी भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक (प्रभारी) आणि पुणे मनपाचे माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ अंतर्गत लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट वस्तूसंग्रहालयातून आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच सातारा येथे झाले आहे.
मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आपल्या पुण्यनगरीमध्ये व्यतीत झाले आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी सोन्याचा नांगर फिरवून या पुण्यनगरीची उभारणी केली. स्वराज्याचा इतिहास लिहीत असताना त्याची सुरुवात आपल्या पुण्यनगरी पासून होते. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा पुण्यनगरीतील शिवप्रेमींकरिता पुण्यनगरीमध्ये ठेवण्यात यावा, अशी विनंती वजा मागणी भिमाले यांनी या पत्रांद्वारे केली आहे.