पिंपरी(प्रतिनिधी)- हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र व उद्योजक अरुण पवार यांना प्रदान करण्यात आला. वृक्षमित्र अरुण पवार यांनी तो सपत्नीक स्वीकारला. दरम्यान, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विलास आप्पा कामटे यांनी गणपतीची मूर्ती देऊन अरुण पवार यांचा सत्कार केला.
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमी आणि हिंदू शौर्य दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित विराट हिंदू मेळाव्यात अरुण पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता ऍड. अश्विनीकुमार उपाध्याय, संस्थेचे कार्यकारी संचालक पं. धर्मवीर आर्य, पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, संयोजक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अश्विनीकुमार ऍड. उपाध्याय यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर मॅकलेची शिक्षण व्यवस्था स्वीकारण्यात आली. यातील दोष समजण्यास ७५ वर्षाचा काळ लागला. गुरुकुल शिक्षण व्यवस्था योग्य आहे. देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर वाढती लोकसंख्या आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी ४ कोटी असणारी लोकसंख्या ७५ वर्षात १४० कोटी झाली. आजही देशात ८० कोटी गरीब आहे. जल, जमीन, जंगल, भूक, भेसळ, गुन्हेगारी, आरोग्य, शिक्षण या सर्व समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येत आहे. आता लोकसंख्येवर नियंत्रण करण्याची गरज आहे.
स्वागत, प्रास्ताविक करताना उत्तम दंडीमे यांनी सांगितले की, भारताला बलसंपन्न आणि शक्तिशाली बनवण्यासाठी, महिलांना सक्षम करणे, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत वेद विद्यालय सुरू करणे यासाठी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान काम करीत आहे.
सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले तर आभार सुहास पोकळे यांनी मानले.