पौडजवळ हेलिकॉप्टर शेतात कोसळले : हेलिकॉप्टरच्या कॅप्टनसह चारजण जखमी

पुण्यात पाैडजवळ हेलिकाॅप्टर काेसळले, कॅप्टनसह चारजण जखमी
पुण्यात पाैडजवळ हेलिकाॅप्टर काेसळले, कॅप्टनसह चारजण जखमी

पुणे(प्रतिनिधी)–पुणे जिल्हयात मुळशी तालुक्यात पौडजवळ पाऊस सुरु असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याने एक हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी हेलिकॉप्टरच्या कॅप्टनसह चारजण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या अपघातात जखमी झालेले कॅप्टन आनंद तसेच  दिर भाटिया, अमिरदिप सिंग, एस.पी.राम या चौघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे हेलिकॉप्टर हे एडब्ल्यू १३९ असून ते मुंबईतील ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे आहे. शनिवारी जुहू मुंबई येथून ते विजयवाडा येथे जात होते आणि हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टनसह तीन प्रवासी प्रवास करत होते. पौड परिसरात शनिवारी पाऊस सुरु असताना संबंधित खासगी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे ते पौड परिसरातील कोंढवळे या गावाच्या शेतात झाडावर कोसळले. त्यामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याचे पाहताच, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टर कोसळल्याने जखमी झालेले प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांना नागरिकांनी चादर, बाजमध्ये टाकून तातडीने रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच, पौड पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत घटनेचा पंचनामा केला. नेमका हेलिकॉप्टरचा अपघात कशामुळे झाला याबाबतची स्पष्टता अद्याप झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याची वितरण साखळी मजबूत करून 'फार्मपाल'ची पुणेकरांना मदत