हर्षवर्धन सपकाळांसारखा नेता प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पुण्यातील कॉँग्रेस अॅटीव्ह मोडवर

harshavardhan sapkal
harshavardhan sapkal

पुणे(प्रतिनिधि)—आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसनेही कंबर कसली आहे. लोकसभेतल्या यशानंतर विधानसभेला सपाटून मार खाल्ल्याने अगोदरच निष्प्रभ झालेल्या पुणे शहर कॉँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळांसारखा नेता प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर थोडी उर्जितावस्था आल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभा निहाय निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक नियुक्त केले आहेत.

विधानसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीनही पक्षांची तीन दिशेला तीन तोंडं अशी अवस्था आहे. तिन्ही  पक्षाला मोठी गळती लागली असून महायुतीकडे नेत्यांचा ओघ वाढला आहे. अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्षसंघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सदस्य नोंदणी अभियान हातात घेण्यात आला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवून पक्षाची ताकद अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभा निहाय निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक नियुक्त केले आहेत.

अधिक वाचा  एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास शरद क्रीडा-सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पाठींबा

त्यानुसार वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून बाळासाहेब शिवरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक हे संतोष आरडे असणार आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अविनाश बागवे हे निरीक्षक तर राजेंद्र भुतडा सहाय्यक निरीक्षक असतील.

त्याचप्रमाणे कोथरूडमध्ये सुनिल शिंदे निरीक्षक तर संदीप मोकाटे सहाय्यक निरीक्षक, पर्वती मतदारसंघात संजय बालगुडे निरीक्षक तर सतीश पवार सहायक निरीक्षक पुणे कॅन्टॉन्मेंट मध्ये दिप्ती चवधरी निरीक्षक तर मेहबुब नदाफ सहायक निरीक्षक कसबा विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. अभय छाजेड निरीक्षक तर अजित दरेकर सहाय्यक निरीक्षक, हडपसर सुजित यादव निरीक्षक तर देवीदास लोणकर सहाय्यक निरीक्षक असणार आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेनाही महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की प्रमुख राजकीय पक्ष एकला चलो ची भूमिका घेणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे वेळ पडल्यास स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी असावी या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा- बावनकुळे

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या विधानसभानिहाय निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांना आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या त्या मतदारसंघात प्रत्यक्ष जाऊन बैठका, मेळाव्यांचे आयोजन करावे लागणार आहे. तसेच पक्षसंघटनेबाबतचा सद्यपरिस्थितीचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीस सादर करावा, असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.

ठाकरे सेनेचे ‘मिशन पुणे’ लॉंच : इच्छुकांच्या मुलाखती सुरू

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदेंच्या सेनेने लॉन्च केलेल्या ‘मिशन टायगर’ची राज्यभर चर्चा आहे. ज्या पद्धतीने राज्यात मिशन टायगर सुरू आहे त्याच धर्तीवर पुण्यामध्ये देखील शिंदेंच्या सेनेकडून मिशन पुणे लॉन्च करण्यात आले आहे.

मिशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील आणि काँग्रेस मधील नाराजांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेची सेना करीत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला आणखी गळती लागण्याची शक्यता असतानाच ठाकरे सेनेने देखील मिशन पुणे लॉन्च केले असून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ठाकरेंच्या सेनेकडून देखील आगामी महापालिका निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच दृष्टिकोनातून ठाकरेंच्या सेनेने पुण्यामध्ये महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांची मुलाखती घेतल्या. दोन दिवस चाललेल्या या मुलाखतीमध्ये पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल १८० जणांनी शिवसेनेकडून आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

अधिक वाचा  कधी कधी वाटतं आत्ता जो निर्णय घेतला आहे तो २००४ सालीच घ्यायला पाहिजे होता- अजित पवार

याबाबत माहिती देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, “पुण्यात दोन दिवस घेतलेल्या मुलाखतीमध्ये १८०  जणांनी आमच्याकडून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. यामध्ये गेल्यावेळी निवडणूक लढवलेल्या १३८ जणांपैकी बहुतांशजण मुलाखतीला उपस्थित होते. मात्र काही जणांना निवडणुकीसाठी येणं शक्य झालं नाही त्या लोकांसाठी पुन्हा एकदा अशा प्रकारचा मुलाखत कार्यक्रम घेण्यात येणार आहे,”

ज्या १८० इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यापैकी ५० टक्के उमेदवारांना यापूर्वी निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. तरीदेखील आगामी काळात दोन दिवसांसाठी या इच्छुक उमेदवारांचं प्रशिक्षण शिबिर आम्ही घेणार असून आगामी निवडणुकीच्या दिवशी कोणातून त्यांची तयारी करून घेणार असल्याचं थरकुडे यांनी सांगितलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love