पुणे(प्रतिनिधि)—झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची रेकी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला, त्याचा साथीदार सराइत गुंडाला आणि सराफ व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी, १५० हिरे, दुचाकी, दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, रा. मुखेड, जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय ३५, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता), सराफ व्यावसायिक भीमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (वय ३९) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहायक आयुक्त राहुल आवारे यावेळी उपस्थित होते. स्वारगेट परिसरात गेल्या महिन्यात १९ डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाकडून करण्यात येत होता. पोलिसांनी जवळपास १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. तपासात एके ठिकाणी चित्रीकरणा गणेश काठेवाडे याची अस्पष्ट छबी आढळून आली होती. तपास पथकातील पोलीस कर्मचारी रफीक नदाफ, शंकर संपत्ते, सागर केकाण, दिनेश भांदुर्गे यांना स्वारगेट भागातील घरफोडी सराइत चोरटा काठेवाडेने केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. कोंढवा परिसरातील उंड्री भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने झोमॅटोच्या डिलिव्हरी बयसारखी वेशभूषा करुन शहरातील विविध सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडीचे १४ गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्याने स्वारगेट एसटी स्थानकात परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे सात गुन्हे केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. चोरलेले दागिने त्याने सराइत गुन्हेगार सुरेश पवार याच्याकडे दिले होते. पवार याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. या गुन्ह्यात त्याने जामीन मिळवला होता. काठेवाडे दिलेले दागिने पवारने सराफ व्यावसायिक भीमसिंग राजपूत याच्या मध्यस्थीने विक्री केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राजपूतला अटक केली. आरोपी पवार हा मुळशी तालुक्यातील अंबडवेट गावचा माजी उपसरपंच आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी पवार याच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त केली.
घरफोडीची वेगळी मोडस
गणेश काठेवाडे हा स्वत:ची ओळख लपविण्यासाठी उच्चभ्रु सोसायटीमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून जाऊन रेकी करुन घरफोडी करत. पोलीस सीसीटीव्ही चेक करुन आपल्यापर्यंत पोहचू नयेत, म्हणून तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना ४० ते ५० किमीचा प्रवास छोट्या छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. घरफोडी केल्यानंतरही स्वत:ची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. चुकून सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये त्याची छबी आलीच तर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून तपास भरकटावा यासाठी तो मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची अॅक्टींग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीच्या पैशांमधून कर्वेनगर भागामध्ये पॉश एरियामध्ये फ्लॅट घेण्याच्या प्रयत्नात होता. चोरीचे दागिन्यांमधून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवले. काही शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुरेश पवार हा अंबरवेड या गावचा माजी उपसरपंच असून तो बाळू मारणे (रा. आंबेगाव, मुळशी) यांच्या खुनातील आरोपी असून तो मोक्कामध्ये कारागृहात होता. त्याने स्वसरंक्षणासाठी घराचे टेरेसवर २ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे ठेवली होती. पोलिसांनी ती जप्त केली.
भिमसिंग राजपूत हा सोन्याच्या नथ बनविण्याचा व्यवसायिक आहे. सुरेश पवार याच्याकडून काही सोने घेऊन ते विविध सोनारांकडे गहाण ठेवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे घेऊन ते पवार याला देत होता. या गुन्हेगारांकडून एकूण १४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.