कुख्यात गुंड गज्या मारणेला अटक : केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं पडलं महागात

कुख्यात गुंड गज्या मारणेला अटक
कुख्यात गुंड गज्या मारणेला अटक

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कोथरुडमध्ये शिवजयंतीच्या दिवशी भाजपा कार्यकर्ता संगणक अभियंता देवेंद्र जोगला कुख्यात गुंड गजानन मारणे याचा भाचा आणि इतरांनी जबर मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणेला अटक करण्यात आली आहे. गजानन मारणे स्वत: कोथरूड पोलिस ठाण्यात हजर झाला.

मारहाण करण्यात आलेला जोग हा भाजप आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्ता आहे. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर  मोहोळ यांनी पुणे पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले होते आणि शहरात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला होता. तर कालच (सोमवारी) दुपारी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित वार्तालापात या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आल्याचे सांगितले होते. तसेच त्यांचा टोळीप्रमुख गजा मारणे यालाही आरोपी करण्यात आलं असून त्याला देखील अटक करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. संध्याकाळी गजानन मारणे याला अटक करण्यात आली.

शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे देवेंद्र जोग या तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केली होती. मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांचा वादविवाद झाला त्यामध्ये चौघांनी   देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम ३०७  (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी ओम जिज्ञासू, किरण पडवळ, आणि कुणाल तापकीर या तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले आहेत. त्यांचाही शोध पोलिस घेत आहेत.

अधिक वाचा  गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश:नऊ जणांना अटक

दरम्यान, देवेंद्र जोग हा भाजपचा कार्यकर्ता असल्याने, मंत्री मोहोळ यांनी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधून विचारपूस केली, तसेच पुण्यात आल्यानंतर घरी जाऊन भेट घेतली आणि पुणे पोलिसांना चांगलेच फैलावर घेत शहरात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला होता. पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. डोळे बंद करून बसण्याचा काळ गेला. आता कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. शेवटी देवेंद्र असो किंवा कोणताही पुणेकर, माझ्या शहरात असे चालू देणार नाही. चूक करणारा कोणीही असला, तरी त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे. यामध्ये सहभागी असणाऱ्यांना वाचवायला कोणी येत असेल, तर त्यांना पोलिसांनी सोडू नये. या प्रकरणी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे मोहोळ म्हणाले होते. या वक्तव्यांनंतर पोलिसांनी तातडीने तीन आरोपींना पकडून त्यांची धिंड काढली होती.

अधिक वाचा  छावा करमुक्त होणार? देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

आज(मंगळवार) न्यायालयात हजर करणार

दरम्यान यापूर्वी ३ आरोपींना अटक केली होती, आणखी २ आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. गजा मारणेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आज (मंगळवार) न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

टोळीतील गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही – पोलिस आयुक्त

रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना समज देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात शिवजयंती दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाण झाली होती. त्यातील आरोपींना मोका लावण्यात आला आहे. त्याच्या टोळीप्रमुखाला देखील आरोपी करण्यात आल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित वार्तालापात सांगितले होते.

तसेच गजा मारणे याला देखील आरोपी करण्यात आलं असून त्याला देखील अटक करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. टोळीतील गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही. मात्र, त्यांच्याकडून काही चुकीचे घडले तर त्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

अधिक वाचा  त्या सात जणांची सामुहिक आत्महत्या नव्हे तर हत्या

संपत्ती होणार जप्त

गजा मारणे टोळीच्या संपूर्ण राज्यातील संपत्तीची माहिती घेण्याच काम पोलिस करत आहेत. संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरटीओकडून त्यांच्या वाहनांची माहिती घेतली जात आहे. त्यांची वाहने जप्त करणार. यासोबतच, त्यांच्या बांधकामाची माहितीदेखील महापलिकेककडून घेणार असून त्यांची बांधकामे पाडणार असल्याचेही अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितलं होते.

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love