Harshvardhan Sapkal : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करून महाराजांचा अवमान केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे की, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या घरी असताना सोशल मीडियावरून त्यांना एक व्हिडिओ (रील) पहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मालेगाव येथील उपमहापौर यांच्या दालनातील टिपू सुलतानच्या प्रतिमेबाबत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी टिपू सुलतान यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असे विधान केले. इतकेच नव्हे तर, “शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतानला शिवाजी महाराजांच्या समकक्ष (समान) समजले पाहिजे,” असे वादग्रस्त विधान सपकाळ यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या शिवप्रेमींच्या आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे विधान समाजात तेढ निर्माण करणारे आणि प्रक्षोभक असल्याचा दावा धीरज घाटे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या विधानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
या तक्रारीची दखल घेत पर्वती पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये कलम १९२, १९६(१), १९६(२), ३५२ आणि ३५६(१) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र विठ्ठलराव सहाणे करत आहेत.
नेमका वाद काय?
या वादाची ठिणगी मालेगावमध्ये पडली. नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला. या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आणि स्थानिक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. जोरदार विरोध आणि प्रशासनावरील दबावानंतर अखेर हा फोटो हटवण्यात आला. मात्र, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाने आगीत तेल ओतण्याचे काम केले.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श घेऊनच टिपू सुलतान याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. टिपू सुलतान भारताचे भूमिपुत्र होते आणि त्याने विखारी विचारांना कधीही थारा दिला नाही. शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे.” या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.













