पुणे- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत उत्तर प्रदेश विधानसभाचे अध्यक्ष सतीश महाना (satish mahana) यांनी येथे व्यक्त केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या १ल्या सत्रातील भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे? या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड अध्यक्षस्थानी होते.
या सत्रामध्ये ओरिसाचे युवा आमदार तुषारकांती बेहेरा ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव कृष्णा अलवारु , सीबीआयचे माजी महासंचालक डी आर कार्तिकेयन हे वक्ते म्हणून सहभागी झाले होते. सत्राच्या सुरुवातीला आदिती, प्रताप राज तिवारी नंदिनी रविशंकर, सुधांशु डहाके ,अक्षता देशपांडे या युवकानी मनोगते व्यक्त केली . या सत्रात ओरिसाचे युवा आमदार श्री बेहेरा यांना युवा आमदार तर अध्यात्मिक गुरु इंद्रेश उपाध्याय याना युवा अध्यात्मिक गुरु सन्मान संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
महाना म्हणाले, राजकारणात चांगल्या व्यक्ती आल्या पाहिजेत आणि त्यांनी देखील अधिकाधिक चांगले काम करून समाजापुढे नाव आदर्श निर्माण करावा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनेने दिलेला अधिकार आहे. मात्र त्याचबरोबर राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. आजच्या पुरस्कारामुळे मला माझ्या कामाची पावती मिळाली आहे. यामध्ये माझ्या राज्यातील जनतेचा देखील महत्वाचा सहभाग आहे. त्यामुळे आजचा पुरस्कार हा जनतेला, मतदारांना अर्पण करतो.
संपूर्ण जगामध्ये भारत देशाला सर्वोत्तम राष्ट्र म्हणून निर्माण करण्याचे आपले सर्वांचे प्रयत्न आहेत असे नमूद करून अलवारु यांनी सांगितले की , अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर नियंत्रण असता कामा नये त्याचबरोबर या अधिकारामुळे देश हिताला बाधा येत कामा नये याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे अधिकाराबाबत सारासार विचार करायला हवा.
कार्तिकेयन म्हणाले, युवा वर्गाने आरोग्य, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी यासारख्या विषयावर लक्ष देण्याची गरज आहे .
तर इंद्रेश उपाध्याय यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले कि दैनंदिन जीवनात युवकांनी महत्वाच्या ४ बाबी लक्षात ठेवाव्यात त्यामध्ये युवावस्था मधील वागणे ,अधिकार, संपत्ती, आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे विवेक होय. याचबरोबर जीवनात अध्यात्माला स्थान देणे गरजेचे आहे .
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.