पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म टिकवला आणि वाढविला. त्याच महाराष्ट्रात संत चरणांचे आशीर्वाद मिळणे हे प्रत्येकाचे भाग्य आहे. पैसा, अपत्य किंवा लॉटरी हे भाग्य नाही. संत दर्शन हेच खरे भाग्य आहे. आपल्याकडे प्रत्येकाची प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी धर्म व देशाप्रती भाव असायला हवा, असा सूर संत संमेलनात उमटला.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. याचा समारोप संत संमेलनाने झाला. यावेळी नाशिकच्या महंत वेणा भारती, ह.भ.प.चिदंबरम महाराज साखरे, कीर्तनकार गणेश महाराज भगत, इस्कॉन चे बलभद्रकृपा प्रभू, रासपती प्रभू, परमात्मा प्रभू, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
वेणा भारती म्हणाल्या, विश्वाला एकत्र करण्याची मोहीम भारताने मांडली आहे. पुण्यातील महोत्सवात असेच कार्य झाले असून येथे मठ मंदिरांचे साधू संत यांचे दर्शन झाले. अध्यात्म ही वीरश्री असून महाबळ वाढविणारी आहे. अध्यात्म्यात स्वतःची ओळख करून परमेश्वरापर्यंत ते आपल्याला पोहोचवत असते.
चिदंबरम महाराज साखरे म्हणाले, महाराष्ट्रात असे महोत्सव होणे गरजेचे आहे. पुढील १० ते १५ वर्षात कीर्तन परंपरा चालेल की नाही, अशी शंका काहींना वाटत होती. मात्र अशा महोत्सवातून विश्वास निर्माण होत आहे. तसेच आपल्या परंपरेची ओळख देखील होत आहे.
बलभद्रकृपा प्रभू म्हणाले, परमेश्वराकडे पाठ फिरवली तर आपण अधर्मि होऊ आणि दुःख सुरु होईल. साधू संतांचे हेच काम आहे की अशा लोकांना परमेश्वराशी जोडणे. त्याकरिता गीता, भागवत वाचन आणि नामजप रोज करायला हवे. आपण परमेश्वराला मार्गदर्शक बनविले, तरच योग्य दिशेला जाऊ शकतो.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, देवस्थानाच्या सामाजिक कार्यातून सर्वाना प्रेरणा मिळेल. सेवा, कर्तव्य, त्याग याची महती महोत्सवात पाहायला मिळाली, असेही ते म्हणाले. अशोक गुंदेचा म्हणाले, धर्मावर विश्वास व एकता वाढविणे यासाठी महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. शालेय मुला-मुलींमध्ये संस्कार रुजावे, याकरिता देखील अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. धर्माबद्दल सर्वांच्या मनात प्रेम वाढविणे हाच उद्देश होता, असेही त्यांनी सांगितले. किशोर येनपुरे यांनी सूत्रसंचालन केले.