पुणे(प्रतिनिधि)– महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समरसतेचा आणि समतेचा संदेश आजही प्रासंगिक आहे. संविधान निर्मितीच्या वेळी त्यांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याची गरज व्यक्त केली. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाने त्यासाठी प्रयत्न करायला हवे. समाजात समरसता आणि एकोप्याचा भाव निर्माण करणे हेच त्यांना अभिवादन ठरेल, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर आणि रा.स्व.संघाचे अधिकारी उपस्थित होते. आंबेकर पुढे म्हणाले, तत्कालीन समाजापुढे अनेक अडचणी असतानाही डॉ. आंबेडकरांनी देश आणि समाजाच्या एकसंघतेसाठी प्रयत्न केले. भारतीय समाजातील विशेष करून हिंदू समाजातील एकता आणि आवश्यक त्या सुधारणांकरिता अतिशय ठोस प्रयत्न त्यांनी केले. संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान अतुलनिय असून, आज कोणीही काहीही म्हणत असले तरी संपूर्ण देश संविधानानेच चालतो. आपआपसातील हेवेदावे आणि भेद विसरून समरसतेच्या वातावरणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. अभिवादनानंतर सुनील आंबेकर यांनी समाजातील विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधला.