डिझायनर्सने एआयकडे एक समस्या म्हणून नव्हे तर साधन म्हणून पहावे – डॉन नॉरमन

डिझायनर्सने एआयकडे एक समस्या म्हणून नव्हे तर साधन म्हणून पहावे – डॉन नॉरमन
डिझायनर्सने एआयकडे एक समस्या म्हणून नव्हे तर साधन म्हणून पहावे – डॉन नॉरमन

पुणे: जगभरात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम या विषयावर चर्चा सुरु असताना डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या तरूण  पिढीने याकडे एक समस्या किंवा संकट म्हणून न बघता कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाकडे एक सृजनशीलता वाढवणारे व समस्येचे समाधान करण्याची क्षमता वाढवणारे साधन म्हणून बघावे, असा सल्ला जगविख्यात डिझाईन तज्ज्ञ, लेखक व अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डिझाईन लॅबचे संचालक डोनाल्ड नॉरमन यांनी ‘इनसाइट्स विथ डॉन नॉरमन’ या विशेष कार्यक्रमात उपस्थितांना दिला.

आयुष्य बदलून टाकणारा असा प्रभाव अजूनतरी एआयने माझ्यावर पाडला नाही. परंतु  सहयोगी आणि नैतिक साधनांचे निर्माण सुनिश्चित करण्यासाठी एआयच्या विकासात डिझाइनर्सने सहभागी होणे आवश्यक आहे असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा  व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल करंडक

असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडियाची पुणे शाखा व बिट्स डिझाईन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम एमसीसीआयएच्या सुमंत मुळगांवकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण महाजन व बिट्स डिझाईन स्कूलच्या अधिष्ठाता नंदिता अब्राहम उपस्थित होत्या.

डॉन नॉरमन पुढे म्हणाले की, “बऱ्याचदा धोरणांची आखणी करताना त्यामुळे प्रभावित होणाऱ्या किंवा त्यात थेट सहभाग असणाऱ्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे, धोरणांच्या आखणीमध्ये थेट प्रभावित लोकांचा सहभाग असल्यास प्रभावी उपाय सुनिश्चित होऊ शकतील. धोरण निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास आणि त्यात सहभागी होऊन डिझाइनर्स धोरणांवर प्रभाव टाकू शकतात.”

उत्तम डिझाईनचे एक उदाहरण देताना त्यांनी हवाई वाहतूक यंत्रणा व विमाने यांचे उदाहरण देवून सांगितले की या क्षेत्रात डिझाईनला अत्युच्च महत्व दिले गेले आहे. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात होणाऱ्या अपघातांनंतर त्याविषयीची कारणमीमांसा करताना फार काही उरलेले नसते. जगभरातील शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्याचे कौशल्य व सवय विकसित करणे यावर भर देणे गरजेचे आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीत मूल्यमापन हे खूप व्यक्ती केंद्रित असल्याने टीममध्ये काम करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत असताना विविध कौशल्य असणाऱ्यांचा सहभाग आवश्यक असतो. त्यामुळे एकत्र काम करण्याची संस्कृती ही महाविद्यालयीन जीवनापासून विकसित करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे देखील नॉरमन म्हणाले.

अधिक वाचा  महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा -अजित पवार

बाळकृष्ण महाजन म्हणाले की, “डिझाईन क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर काम केलेल्या नॉरमन यांच्याशी झालेल्या या संवादातून एक व्यापक दृष्टीकोन समजण्यास मदत झाली. काही अत्यंत मुलभूत परंतु दुर्लक्षित असलेल्या महत्वाच्या बाबी समजून घेता आल्या.”

देशातील तरुण पिढीला डिझाईन क्षेत्रात कार्यरत असलेल्या जगातील एका सर्वोत्तम तज्ज्ञाकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळणे हा या उपक्रमाच्या आयोजना मागचा मुख्य हेतू आहे. पुणे शहराबरोबरच, बंगळूरू, नवी दिल्ली येथे देखील डॉन नॉरमन यांच्या ‘इनसाइट्स विथ डॉन नॉरमन’ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love