पुणेः विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मांडले.
ते येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभा प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ इस्रो तथा यु.आर.राव उपकेंद्र, बंगळुरूचे संचालक डाॅ. एम. शंकरन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, सौ.ज्योती ढाकणे-कराड, डाॅ.विनायक घैसास, डाॅ.सुचित्रा नागरे, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव नीलवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन पुढे म्हणाले, अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जिवनाशी व जिवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो. आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतीक प्रगतीही तितकीच महत्त्वाची असते. असेच मुल्याधिष्ठीत व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो आणि अशाच प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम या विद्यापीठाकडून घडत आहे, असे म्हणत, राज्यपालांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या पाठीवर कौतुकाची थापही टाकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी विद्यापीठाने वर्षभरात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा अहवाल मांडला. ते म्हणाले की, पदवी प्रदान सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. ज्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा शेवट व उज्वल भविष्याची सुरवात होत असते. अशात यंदाचा ७वा दीक्षांत समारंभ ‘एमआयटी एडीटी’साठी विशेषार्थाने गौरवाचा दिवस आहे. ‘एमआयटी एडीटी’ने ने परीक्षेसाठी संपूर्ण डिजीटल प्रणाली अवलंबली असून, त्यामुळे निर्विघ्न परिक्षेची अंमलबजावणी, वेळेत अचून निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता ओळख बनली आहे.
विद्यार्थ्याच्या यशात संस्थेचा वाटा महत्वाचा
एम.शंकरन म्हणाले, आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे भारताने नुकतेच जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगूण देशाचे नाव वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. आपल्या देशात जगात कोणाकडेही नाही अशी प्रतिभावंत युवा पिढी आहे आणि याच युवा पिढीच्या खांद्यावर आता डाॅ.कलाम यांनी दाखवलेल्या प्रगत देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. विद्यार्थी केवळ स्वतः कष्टाने जीवनात यशस्वी होत नाही. तर त्याच्या यशामागे, संस्थेसह अनेकांचा हातभार लागलेला असतो. त्यामुळे आता पदवी घेवून समाजात प्रवेश करत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो, याचे कायम भान ठेवा, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
एकूण २९७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विश्वशांती प्रार्थनेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठातील २२ पीएचडी, ५३ सुवर्णपदके व १९४ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र यांसह एकूण २९७२ विद्यार्थ्यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह ८ हजारपेक्षा अधिक लोकांनी देशभरातून हजेरी लावली. तसेच यावेळी राजदंडासह काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पसायदानाने सांगता झालेल्या या कार्यक्रमाचे आभार डाॅ.पुजेरी यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.स्नेहा वाघटकर व प्रा.स्वप्निल शिरसाठ यांनी केले.
एमआयटी एडीटीने एक चांगला विद्यार्थी घडविण्यासोबतच एक मुल्याधिष्ठीत मनुष्य जो अध्यात्म व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल असतो, असे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून आज पदवी मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनीही भारताच्या उज्वल भविष्यात आपला अनमोल वाटा द्यावा, असे मी त्यांना आवाहन करतो.
– प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड,
संस्थापक अध्यक्ष,
माईर्स एमआयटी शिक्षण समुह, भारत