पुणे(प्रतिनिधी)- डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या पिसोळी येथील सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाट्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येत्या १८ मे रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे.
कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डी. टी. रजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, पद्मावती प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका वर्षाताई पाटील, महात्मा फुले मुलींची शाळा नाना पेठच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले यांनी दिली.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दि डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया (डी.सी.एम) संस्थेची स्थापना केली. विशेषतः भारतीय समाजात अस्पृश्य मानलेल्या महार, मांग, चांभार, मेहता आधी लोकांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केली. अस्पृश्य व अन्य गरीब लोकांची शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी शाळा, वसतिगृह स्थापन केले. नोकरी विषयक शिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अशा नामांकित डीसीएम संस्थेचे अहिल्याश्रम नाना पेठ पुणे येथे वरिष्ठ महाविद्यालय, तसेच पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात अनेक माध्यमिक – उच्च माध्यमिक विद्यालय व वस्तीगृह आहे. दोन वर्षांपूर्वी संस्थेचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी स्व. एम.डी. शेवाळे व अध्यक्ष डी. टी. रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पिसोळी येथे सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सुरू केले असून, या महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाट्न येत्या रविवारी होत आहे.