‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन तसेच कौतुकच.. पण… काय म्हणाले शरद पवार?

‘ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन तसेच कौतुकच.. पण
‘ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन तसेच कौतुकच.. पण

पुणे(प्रतिनिधी)– ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन तसेच कौतुकच केले पाहिजे. पाकिस्तानला स्वतःची ताकद आणि भारताची ताकद याची पूर्ण जाणीव आहे. तरीही सावध राहावे लागेल. अमेरिका, जपान व इतर देशांनी या कारवाईला पाठिंबा दिला असला, तरी चीनकडून समर्थन मिळालेले नाही. हे लक्षात घेऊन याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या मोहिमेनंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी संवाद साधल्याचेही त्यांनी नमूद केले.

पवार  म्हणाले, या कारवाईला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय समर्थनीय आहे. त्याचबरोबर या माहिमेला दिलेले ऑपरेशन सिंदूर हे नावही रास्तच आहे. पहलगामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे सबंध देशात अस्वस्थतेचे वातावरण होते. या घटनेनंतर काश्मीरमधील स्थानिक लोकही जनतेसोबत उभे राहिले. विधानसभेतही एकमताने ठराव झाला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादाविरोधात अतिशय स्पष्ट व स्वच्छ भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर भारताने पाकला जे उत्तर दिले, ते योग्यच आहे. मुख्य म्हणजे या हल्ल्याकरिता पाकव्याप्त काश्मीरची भूमी निवडण्यात आली. जिथे दहशतवाद्यांचे तळ आहेत, दारुगोळा आहे व पाकिस्तानकडून जिथे मदत पुरवली जाते, अशा ठिकाणी सैन्याने हल्ला केला. ही कारवाई करताना कुठेही सीमेचे उल्लंघन केले गेले नाही. भारतीय हवाई दलाने नियोजनबद्धरीत्या ही कारवाई केली. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.  या मिशनला अमेरिका, जपाननंतर इतर देशांनीही पाठिंबा दर्शवला, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. पण, चीनकडून समर्थन मिळाले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे ही बाजू समजून घेऊन याबाबत आपण कायम सतर्क राहिले पाहिजे. देशाचे सार्वभौमत्त्व जपण्यासाठी कोणताही त्याग करण्याची देशवासियांची तयारी आहे, हे आपले बलस्थान म्हणता येईल. या स्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सरकारला पाठिंबा द्यायला हवा. पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल, यादृष्टीनेही आपण पावले उचलत आहोत. ही रणनीतीदेखील महत्त्वाची असल्याचे पवार यांनी नमूद केले.

अधिक वाचा  महाराष्ट्राने एक भीष्मपितामह गमावला - दिलीप वळसे पाटील

या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित राहणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी आपली फोनद्वारे चर्चा झाल्याचेही पवार यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love