पुणे –नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहरात काेबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. बुधवारी रात्री सायंकाळी दहा ते गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान हे काेबिंग ऑपरेशन करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी दाेन हजार 893 गुन्हेगारांची तपासणी केली असता त्यापैकी 756 गुन्हेगार मिळून आले. प्रतिबंधात्मक कारवाईच्या 414 केसेस करुन 443 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 16 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे काेबिंग ऑपरेशन मध्ये 176 जणांना सीआरपीसी कलम 149 नुसार नाेटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आर्म अॅक्टनुसार एकूण आठ गुन्हे दाखल करुन आठ आराेपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून सात पिस्टल, एक गावठी कट्टा व नऊ काडतुसे असा दाेन लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल करुन त्यात 66 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 48 काेयते, 14 तलवारी, एक कुकरी, पाच पालघन, एक चाकु, दाेन सत्तुर, दाेन लाकडी साेटे असा 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम 142 प्रमाणे 16 तडीपार इसमांना तडीपार आदेशाचा भंग करुन पुणे शहरात वास्तव्य करीत असल्याचे मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम 122 प्रमाणे संशयित रित्या फिरणाऱ्या 28 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सिंहगड पाेलीस स्टेशनने एका आराेपीला अटक करुन त्याचे ताब्यातून सात लाख 56 हजार रुपये किंमतीचे 63 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. तर, काेंढवा परिसरात 18 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.