पुणे(प्रतिनिधि)— फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यामध्ये आता पुन्हा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुढील १० दिवस थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. किंबहुना काही भागांना या अवकाळी पावसानं झोडपलं. पण, आता मात्र पावसानं राज्याकडे पाठ फिरवली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यातही तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तापमान पुन्हा एकदा १० अंशांहून कमी झाले आहे. तर, किनारपट्टी क्षेत्र असणाऱ्या कोकणापासून मुंबईपर्यंतसुद्धा तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती पुढील २४ ते ४८ तास कायम राहिल्यास निरभ्र आकाश आणि तापमानातील घट पाहता थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
रविवारी राज्याच्या तापमानात चार अंशाची घट झाली. पुढील काही दिवस थंडीत आणखी वाढ होण्यार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात दिवसा ६ डिग्री तापमान वाढ झाली होती. मात्र, या तापमानात आता घट झाली आहे. रात्रीचा पारा ४ डिग्री अंश सेल्सिअसने कमी झाला आहे. रात्रीचे तापमान १८-२० डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत हा पारा १५ ते ११ अंशांपर्यंत खाली घसण्याची शक्यता आहे. पुढील ३ दिवसात किमान तापमानात घट होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरात १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उपनगर व नवी मुंबईतही गारठा वाढायला सुरुवात झाली.
राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान
राज्यात येत्या पाच दिवसात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता पुढे सरकत बंगालचा उपसागर आणि भारतीय उपसागराच्या दिशेला आहे. येत्या २४ तासांत राज्याच्या तापमानात घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेतील थंड कोरड्या वाऱ्यांनी राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून खान्देश, नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दिनांक १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार १० डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.