पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जून-जुलै २०२५ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वीची पुरवणी परीक्षा २४ जून २०२५ ते ०८ जुलै २०२५ या कालावधीत, तर १२ वीची पुरवणी परीक्षा २४ जून २०२५ ते १६ जुलै २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा:
https://www.mahahsscboard.in आणि http://hscresult.mkcl.org
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा:
https://www.mahahsscboard.in आणि http://sscresult.mkcl.org
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज:
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी बुधवार, ३० जुलै २०२५ ते शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील आणि शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/UPI/नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रिया:
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन दिवसांत विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात, विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
श्रेणी/गुणसुधार योजना
जून-जुलै २०२५ च्या १० वी आणि १२ वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी पुढील तीन संधी उपलब्ध असतील: फेब्रुवारी-मार्च २०२६, जून-जुलै २०२६ आणि फेब्रुवारी-मार्च २०२७.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील परीक्षांसाठी नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि ITI द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जातील. यासंदर्भात तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.