*पुणे:* आपल्या चविष्ट बाकरवडीसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’ या अग्रगण्य संस्थेने उत्पादनात आधुनिकतेची कास धरत भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ हा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १६ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती चितळे परिवारातील चौथी पिढी आणि संस्थेचे भागीदार इंद्रनील व केदार चितळे यांनी दिली. सुमारे २५ एकर जागेवर पसरलेला हा प्रकल्प २५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारण्यात आला असून, तो भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगात एक मैलाचा दगड ठरणार आहे.
रांजे व्हिजन पार्क हे केवळ एक उत्पादन केंद्र नसून ते जागतिक दर्जाच्या मानकांनुसार उभारलेले ‘एक्सपिरियन्स सेंटर’ असणार आहे. इंद्रनील चितळे यांनी माहिती दिली की, या प्रकल्पाला एफएसएससी २२०००, ग्लोबल फूड सेफ्टी इनिशिएटिव्ह (GFSI), यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (USFDA) आणि ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियम (BRC) यांसारखी आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. या प्रकल्पामुळे संस्थेची उत्पादन क्षमता वाढणार असून, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी पूर्ण करणे सोपे होणार आहे. या पार्कमध्ये मिठाई आणि नमकीनसाठी दोन स्वतंत्र उत्पादन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, त्यांची दररोज ४० टन उत्पादन करण्याची क्षमता आहे.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ग्राहकांसाठी खुले असणारे ‘व्ह्यूइंग गॅलरी’ आणि ‘एक्सपिरियन्स सेंटर’ हे होय. केदार चितळे यांनी सांगितले की, ग्राहकांना आता प्रत्यक्ष चितळे बंधूंच्या उत्पादनांची निर्मिती कशी होते, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येईल. १०० मीटर लांबीच्या एका विशेष भिंतीद्वारे चितळे बंधूंचा आजवरचा प्रवास उलगडला जाणार आहे. पूर्णतः स्वयंचलित (Automated) यंत्रणेद्वारे, मानवी हाताचा स्पर्श न लागता जागतिक दर्जाची स्वच्छता राखून पदार्थ कसे तयार केले जातात, हे पाहण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. भविष्यात येथे एका कॅफेची योजना देखील असून लवकरच संस्थेच्या संकेतस्थळावरून (Website) नावनोंदणी करून ग्राहकांना या पार्कला भेट देता येईल.
विस्तार योजनेवर भाष्य करताना इंद्रनील चितळे म्हणाले की, सद्यस्थितीत चितळे बंधूंचे ४५० हून अधिक पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. सध्या १० राज्यांमध्ये १ लाख २५ हजार टच पॉईंट्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या चितळे बंधूंनी येत्या ३ वर्षात ही संख्या ५ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, सध्या असणारा ८ ते ९ टक्के निर्यातीचा वाटा वाढवून तो २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य संस्थेने समोर ठेवले आहे. पिढ्यानपिढ्या ग्राहकांशी असलेले विश्वासाचे नाते या आधुनिक प्रकल्पामुळे अधिक घट्ट होईल, असा विश्वास चितळे परिवाराने व्यक्त केला आहे.















