पुणे-पूरग्रस्तांना भेटण्यासाठी व एकूणच पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हेलिकॉप्टरने निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खराब हवामानामुळे आपला सातारा दौरा सोमवारी रद्द करावा लागला. दृश्यमानता कमी असल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणारे हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याला परतले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.
सातारा जिल्हय़ातील कोयनानगर परिसरामधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री आज पाहणी करणार होते. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने साताऱयाला निघाले होते. मात्र, पुणे ते कोयनानगर हवाई मार्ग प्रवासाच्या दृष्टीने सध्या योग्य नाही. या मार्गावर दृश्यमानता कमी आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुण्याकडे फिरविण्यात आले. हा दौरा रद्द झाला असला, तरी कोयनानगर परिसरातील दरडग्रस्त नागरिकांना मदत पोहोचवण्यास कसलाही विलंब न लावण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या दौऱयात मुख्यमंत्री दुर्घटनाग्रस्त भागाची हवाई पाहणी करून कोयनानगर हेलिपॅडवर उतरणार होते. तिथून कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस करणार होते. याशिवाय, जिल्हा प्रशासनाची आढावा बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र, खराब हवामानामुळे हा नियोजित दौरा रद्द करण्यात आला. दरम्यान, दौरा रद्द करून मुख्यमंत्री मुंबईकडे परतल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले.