पुणे(प्रतिनिधी)—-महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन, विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने एक वातानुकूलित ‘ई-बस’ मंदिर समितीस प्रदान केली आहे. या ‘ई-बस’ चे नामकरण ‘सहकार भक्ती-रथ’ असे करण्यात आले असून, शनिवार, ५ जुलै २०२५ रोजी पंढरपुरात सायंकाळी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण होणार आहे.
मंदिर प्रशासनाने ‘नो व्हेईकल झोन’ केल्यामुळे भाविकांना होणारा त्रास विचारात घेऊन मंदिर समितीने राज्य सहकारी बँकेला ‘ई-बस’ देण्याची विनंती केली होती. राज्य सहकारी बँकेने ही विनंती तात्काळ मान्य केली, कारण राज्यातील सामान्य शेतकऱ्यांचा देव विठ्ठल असून, बँकेद्वारे वितरित होणारे प्रत्येक कर्ज सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते अशी बँकेची भावना आहे.
‘सहकार भक्ती-रथ’ ही संपूर्ण वातानुकूलित असून, त्यात टी.व्ही. सह सर्व अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बसमध्ये १४-१६ भक्तांची आसनव्यवस्था असून, भाविकांना टी.व्ही.वर श्री विठ्ठलाच्या पूजेचे थेट दर्शन सतत होणार आहे. हैदराबाद येथील मे. तेजस्वी ग्रुप या कंपनीने २२ लाख रुपये किमतीची ही बस तयार केली आहे.
यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे केले जात असून, याच पार्श्वभूमीवर राज्यातील सहकार क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या राज्य सहकारी बँकेतर्फे सेवाभावी वृत्तीने ही बस भक्तांच्या सेवेत दिली जात आहे. उल्लेखनीय आहे की, बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातही श्री विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, १० ऑक्टोबर २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्तेच तिचे अनावरण झाले होते.