पुणे(प्रतिनिधी)- इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केल्याने आपल्याकडे करमणूक कर नाही. त्यामुळे ‘छावा’ चित्रपट हा करमुक्त करता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस हे कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. ऐतिहासिक असा हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु, महाराष्ट्रात करमणूक करच नाही.
त्यांना त्यांची जागा दाखवू
संभाजी महाराज यांच्याबद्दल विकीपीडीयावर वादग्रस्त लिखाण आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, विकीपीडीयाला नोटीस बजवण्याचे निर्देश दिले गेले आहे. तसेच संभाजी महाराजांना अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू. असे कोणी वागत असेल तर त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू आणि शिवप्रेमी त्यांना जागा दाखवतील. संभाजी महाराज यांच्यासंदर्भात निर्माण होणारा वाद राजकीय किनार असणारा आहे. तथापि यासंदर्भात अनेक समित्या केल्या गेल्या आहेत. त्याच्यावर सरकारने निर्णयसुद्धा घेतले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबतच पुण्यात आले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले. परंतु दोन्ही मुख्यमंत्री त्यांच्यासोबत नाही. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे माझ्यासोबत पुण्यात आले. परंतु त्यांचे वेगळे कार्यक्रम असल्यामुळे ते निघून गेले, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी यावेळी दिले.