दिल्ली(ऑनलाईन टीम)- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीचा निकाल बुधवारी जाहीर केला. दहावीचे विद्यार्थी त्यांचे निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि results.nic.in आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटद्वारे दहावीचा निकाल जाहीर केला. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या निकालाप्रमाणेच कोणतीही पत्रकार परिषद किंवा गुणवत्ता यादी यावर्षी जाहीर करण्यात आलेली नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल म्हणजेच गुणपत्रिका, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकर किंवा उमंग ऍपमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोनामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक विषयांचे पेपर झाले असले तरी उत्तर भारतात, मात्र सर्व पेपर झालेले नाहीत. सीबीएसई परीक्षांचा वाद सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला होता. सीबीएसई बोर्डाने दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, मात्र अनेक राज्यांनी त्या तारखांना परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने सीबीएसईने 1 ते 15 जुलै दरम्यान जाहीर केलेल्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच सीबीएसईकडून न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.
असा पहा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दहावीचा निकाल
सर्वप्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
सीबीएसईची अधिकृत वेबसाइट-cbseresults.nic.in आहे.
मुख्यपृष्ठावर आपल्याला दहावीच्या निकालाची link दिसेल.
या link वर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल.
तिथे आपला सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर विद्यार्थ्यांना स्क्रीनवर निकाल मिळेल.
विद्यार्थी त्यांचा निकाल डाउनलोड करून शकता आणि प्रिंट आउटही घेऊ शकतात.
एसएमएसद्वारेही निकाल बघा
एसएमएस करून देखील विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी CBSE10 असं टाईप करुन त्यानंतर एक स्पेस देऊन विद्यार्थ्यांचा रोल नंबर पुन्हा स्पेस हॉल तिकीट आयडी टाईप करुन 7738299899 या क्रमांकावर पाठवला तर विद्यार्थ्यांना लगेच त्याचा दहावीचा निकाल कळू शकेल.
मुलींनी मारली बाजी
सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात यंदा 91.46 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा पास केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 0.36 टक्क्यांनी यंदा निकाल वाढला आहे. नेहमप्रमाणेच यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात 93.31 टक्के मुली पास झाल्या आहेत. 90.14 टक्के मुलं पास झाली आहेत.
पुणे विभाग टॉप 5 मध्ये
सीबीएसई बोर्डाचा महाराष्ट्राचा निकाल 98 टक्के लागला. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजेच 99.28 टक्के लागला. दुसऱ्या स्थानावर चेन्नई विभाग असून 98.95 टक्के तर तिसऱ्या स्थानी बेंगळूर 98.23 टक्के तर चौथ्या स्थानी पुणे विभाग असून 98.5 टक्के निकाल लागला आहे.