Bhimthadi Horses : मराठा घोडदळाचा (Maratha Cavalry) अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना (Bhimthadi Horses) आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती ( official separate species ) म्हणून मान्यता मिळाली आहे. या संदर्भात नुकतीच राजपत्रीय अधिसूचना ( Gazette Notification ) जारी करण्यात आली असून यामुळे आता अनेक वर्षे भीमथडी अश्वांचा प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा त्यांना मिळाला असल्याची घोषणा अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे (All India Bhimathdi Horse Association) व बारामती अश्वपागेचे संस्थापक (Founder of Baramati Ashwapag) रणजीत पवार (Ranjit Pawar) आणि बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या (National Research Center of Equines) प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता(Dr. Sharad Mehata) यांनी आज आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. (Bhimathdi horses of Maharashtra are now officially recognized as a separate breed)
रोहिड खोऱ्यातील कान्होजी जेधे (kanhoji Jedhe) यांचे १४ वे वंशज इंद्रजीत नेताजीराव जेधे(Indrajit Netajirao Jedhe), नांदेडकर पिलाजी जाधवराव ( Nandedkar Pilaji Jadhavrao )यांचे १४ वे वंशज समीरसिंह विक्रमसिंह जाधवर (Sameer Singh Vikram Singh Jadwar) , पारगडच्या चंदगड तालुक्यातील तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांचे १३ वे वंशज रायबा शिवराज मालुसरे, सरनौबत येसाजी कंक यांचे १४ वे वंशज सिद्धार्थ संजय कंक, कानंद खोऱ्यातील झुनाराव मरळ यांचे १३ वे वंशज प्रवीण विढळराव मरळ, वाघापुर पुरंदर येथील सुभेदार इंदलकरांची १४ वे वंशज श्रीनिवास अरुणराज इंदलकर, मावळ खोऱ्यातील किरकटवाडीच्या जैताजीराव करंजावने देशमुख यांचे वंशज गोरख रोहिदास करंजावने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजीत पवार म्हणाले, “भीमथडी अश्वांच्या प्रजातीचा उगम महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठी झाला. हे अश्व दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात आढळतात. ऐतिहासिकदृष्ट्या भीमथडी अश्वांनी मराठा साम्राज्याचे घोडदळ म्हणून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली आहे.”
भारतातील मणीपुरी, स्पिती, भुतिया, मारवाडी, काठियावाडी, झंस्करी, के सिंधी या मान्यताप्राप्त अश्व प्रजातींमध्ये आज भीमथडी अश्वांना देखील मान्यता मिळाली आहे असे सांगत पवार पुढे म्हणाले, “आम्ही अश्वप्रेमी आणि महाराष्ट्रातील काही अश्व प्रजातींचे संवर्धन करणा-यांनी या प्रजातीची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आम्हाला अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी), बारामती आणि इतर सहकारी यांचीही मोलाची मदत झाली. या अंतर्गत राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्राच्या सहकार्याने एक समर्पित टीम तयार करण्यात आली. याद्वारे वैज्ञानिक आणि प्रशासकीय आवश्यकतांची पूर्तता करण्यात आली. शिवाय डॉ. मेहता यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या शिष्टमंडळाने बारामतीला भेट दिली. शिवाय महाराष्ट्रात आम्ही स्वतः देखील विविध स्थळांना भेटी देऊन स्थानिक शेतकरी आणि अश्व पालक वापरत असलेल्या या भीमथडी अश्वांची खरी उपयुक्तता आणि क्षमता त्यांना दाखवून दिली. आता आमच्या या तीन वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असून भीमथडी अश्वांना अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा मिळाला आहे, असेही पवार म्हणाले.
या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ मेहता म्हणाले, “भीमथडी अश्व प्रजातीला हा अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी १००० हून अधिक घोड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इक्विन्स (एनआरसीई) यांकडे पाठवण्यात आले. यांतील ५०० हून अधिक नमुन्यांची डीएनए चाचणी करीत ही खरोखरच एक स्वतंत्र प्रजाती आहे आणि भारतातील कोणत्याही प्रस्थापित प्रजातीसोबत तिचा डीएनए जुळत नाही याची खात्री करून घेण्यात आली. आम्ही केलेली नमुन्यांची चाचणी ही इतर योग्य पद्धतीची होती की मान्यतेसाठी आलेल्या ६६ अर्जांमधून केवळ ८ प्रजातींना मान्यता मिळाली असून यामध्ये भीमथडी अश्वांचा समावेश आहे. आज भीमथडी अश्वांची औपचारिक आकडेवारी ही ५१३४ इतकी आहे.”
सर्व घोड्यांचे नमुने गोळा करण्यासाठी भटक्या घुमंतू समुदाय ज्यांच्याकडे हे अश्व मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांना यासाठी तयार करणे, ते परीक्षणासाठी बिकानेर येथे पोहोचेपर्यंत सर्व गोष्टीमध्ये रणजित पवार यांनी खूप महत्वाचे योगदान दिले आहे.
आज या प्रजातीला महत्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपण एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून अश्वांच्या पोलो या साहसी खेळासारख्या अनेक खेळांमध्ये या प्रजातीचा समावेश करण्याची आमची योजना आहे. सोबतच, या प्रजातीची वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रजनन पद्धती सुधारण्यासाठी ब्रीड शो आणि शैक्षणिक कार्यशाळा देखील आयोजित करण्याचा आमचा मानस आहे, असे रणजीत पवार म्हणाले. याचाच एक भाग म्हणून येत्या २० व २१ जानेवारी रोजी बारामतीत होणाऱ्या कृषी मेळाव्यात भीमथडी अश्व प्रजातीचा पहिला अधिकृत शो होणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.