पिंपरी(प्रतिनिधी) – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असणारा नीलेश चव्हाण याच्या मागावर पिंपरी – चिंचवडसह पुणे पोलीसही आहेत. मात्र, दोन्ही पोलीस दलांना गुंगारा देत चव्हाण मोकाट फिरत आहे. आता चव्हाण हा परदेशात पळून जाऊ नये यासाठी त्याच्या विरोधात पिंपरी – चिंचवड पोलीसांनी ‘लुक आऊट’ नोटीस काढली आहे.
नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) याच्याविरोधात रविवारी (दि. २५) बावधन पोलिसांनी ‘लुक आउट’ नोटीस जारी केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शनिवारी (दि. २४) कलम वाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी केले आहे. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडे असताना कस्पटे कुटुंबीय त्याच्याकडे बाळ आणण्यासाठी गेले असता त्यांना नीलेश याने पिस्तूलचा धाक दाखवून धमकाविले होते. त्या प्रकरणातही वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात नीलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे. हे गुन्हे दाखल झाल्यापासून नीलेश चव्हाण अद्यापही पसार आहे. दोन्ही पोलीस दलांची, पथके त्याच्या मागावर आहेत. ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, पोलिसांना अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. नीलेश चव्हाण याच्या भावासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींकडेही बावधन पोलिसांनी रविवारी कसून चौकशी केली. दरम्यान, नीलेश चव्हाण हा परदेशात पळून जावू नये, यासाठी बावधन पोलिसांकडून त्याच्याविरोधात ‘लुक आउट’ नोटीस काढण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.
पळून जाण्यात वापरलेली बलेनो मोटार जप्त
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर पसार झालेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पिता-पुत्र बलेनो, थार, इंडेव्हर अशा,आलीशान कारमधून फिरल्याचे तसेच, फार्म हाऊस, लॉज, शेतावर राहत यथेच्छ पार्ट्याही झोडल्याचे आणि मटणावर ताव मारल्याचेही समोर आले होते. दोघा बाप-लेकांनी लगतच्या तालुक्यांमध्ये ज्या मोटारींमधून प्रवास केला त्यापैकी थार व इंडेव्हर या दोन मोटारी पोलीसांनी शनिवारी (दि. २४) जप्त केल्या. तर तिसरी बलेनो मोटारही रविवारी पोलिसांनी जप्त केली.