खगोलशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन

खगोलशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन
खगोलशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन

पुणे(प्रतिनिधि)– भारताच्या वैज्ञानिक क्षेत्राला जागतिक स्तरावर नेणारे, खगोलशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांच्या पार्थिवावर काल (बुधवार)  पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विज्ञान जगतातील एक तेजाने तळपणारा तारा निखळल्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. काल सकाळी, वयाच्या ८६ व्या वर्षी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी झोपेतच त्यांचे निधन झाले होते.

सकाळपासूनच पुणे शहर आणि राज्याच्या विविध भागातून आलेल्या मान्यवरांनी आणि सामान्य नागरिकांनी डॉ. नारळीकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव प्रथम आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी डॉ. नारळीकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अनेक मान्यवर आणि नागरिकांनीही ‘आयुका’ येथे श्रद्धासुमने वाहिली.

अधिक वाचा  आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे-डॉ. प्रमोद चौधरी

त्यानंतर, त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमी येथे आणण्यात आले. शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले, उप विभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह डॉ. नारळीकर यांचे कुटुंबीय, त्यांचे जवळचे नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ आणि विज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेरचा निरोप देताना, पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून, तसेच शोकशस्त्र आणि बाजूशस्त्र सलामी देऊन डॉ. नारळीकर यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या महान शास्त्रज्ञाला श्रद्धांजली अर्पण केली.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love