पुणे(प्रतिनिधि)–केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज आहेत. मला नकली संतान म्हणणाऱ्यांना आता अहमद शहा अब्दाली म्हणायला मी का घाबरू, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निकालानंतर भाजप नेत्यांच्या पाठीवर अधिक वळ उठतील. औरंगजेबाप्रमाणे भाजपाची कबर महाराष्ट्रात बांधून यांची वळवळ कायमची थांबवू, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे ठाकरे सेनेचा शिवसंकल्प मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधला. पक्षाचे नेते भास्कर जाधव, संजय राऊत, सुषमा अंधारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, मी अमित शहा यांना यापुढे अहमद शहा अब्दाली, असेच संबोधणार. मला तुम्ही नकली संतान म्हणालात, तेव्हा लाज नाही वाटली. मग तुम्ही अहमद शहा अब्दाली आहात, हे बोलायला मी का घाबरू? हा अहमद शहा अब्दाली पाहीजे की भगवा हातात घेतलेला शिवसैनिक पाहिजे? हे आता जनतेने ठरवावे. इतिहासात आपण डोकावले, तर शाहिस्तेखान तरी थोडा हुशार होता, असे म्हणावे लागेल. त्याचे बोटावर निभावले. तीन बोटे कापली गेल्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. मात्र, अमित शहा यांनी यातून काही शहाणपण घेतलेले दिसत नाही. तसे ते घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते. मात्र, ते परत आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्मयांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले, हे पाहण्यासाठी ते आले. लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावर उठले, त्यापेक्षा अधिक वळ विधानसभेच्या निकालात उठतील. त्यानंतर तुमची वळवळ कायमची थांबलेली असेल, असेही त्यांनी फटकारले.
शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका करणाऱयांनी आधी आरशात पहावे. नवाज शरीफचा केक खाणाऱयांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचे का? आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आमचे हिंदुत्व हे साधूसंतांचे आणि शिवाजी महाराजांचे आहे. आम्ही हर हर महादेव म्हणणारे आहोत. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता. पण औरंगजेबाचे पाय चाटत होता. तसेच गद्दार आपल्याकडून तिकडे गेले. गद्दारांनीच घात केला. विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला. त्यामुळे तुमच्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होते.
आम्ही काँग्रेसशी आघाडी केली तर हिंदूविरोधी होतो का? मग तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीगबरोबर मांडीला मांडी लावून का बसले होते, हे सांगा. जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन केले होते. आजही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडी केली. नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
टरबूजला खड्डय़ात घाला
गडकरी म्हणत होते असे रस्ते बांधू, की दोनशे वर्षे खड्डाच पडणार नाही. मुंबई -गोवा मार्ग बघा. सगळीकडे खड्डेच दिसत आहे. त्याचे फोटो काढा आणि त्यांना खड्डा पुरुष पुरस्कार द्या। टरबूज जाऊ द्या हो. त्याला खड्डय़ात घाला, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
भाजपला पाठिंबा देणे हे आमचे पाप
संसद गळत आहे, ज्याने संसद बांधली. तोच नदी सुधारचे काम करत आहे. कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. तोही गुजरातचा आहे. संसद बांधून वर्षही झाले नाही, तोच ती गळायला लागली. मोदी काँग्रेसकडे ७० वर्षांचा हिशोब मागत आहेत. त्यांनी १२ महिन्यापूर्वी बांधललेली संसद गळत आहे. राम मंदिर गळत आहे. पेपर लिक होत आहे. त्याचा हिशोब द्या. मग काँग्रेसला हिशोब विचारा. हे गळती सरकार आहे. आम्ही यांना पाठि?बा दिला होता, हे आमचे पाप होते, अशी कबुलीही त्यांनी दिली.
जनतेच्या न्यायालयात न्याय मिळेल
सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सुनावणी येत्या ६ ऑगस्टला होण्याची शक्मयता आहे. न्यायालयाला उद्देशून आता शेवटची विनंती करतो, नाही तर नाद सोडतो. आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. शिवसैनिक वकील आहे. जनता न्यायाधीश आहे. त्यामुळे जनता आपला निकाल देईल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
लोकशाही फक्त शिवसेनेची लढाई नाही. उद्या त्यांना अपात्र ठरवले तरी ते निवडणूक लढू शकतात. मग आम्हाला कुठे न्याय मिळाला. पण तुमच्याकडे आम्ही आशेने पाहतो. दिवसाढवळय़ा लोकशाहीचा खून करणारे खूनी आमच्यावर राज्य करत असतील, तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. गद्दारांनी चोरबाजार मांडला आहे. लुटालुट सुरू आहे. कंत्राटावर कंत्राट देत आहेत. पैसा उभा करत आहेत. हाच पैसा निवडणुकीत वापरणार आहे. लाडकी बहीण करून, लाच देऊन मत मागत आहेत. यांना लाज वाटली पाहिजे, असेही ठाकरे यांनी सुनावले.