पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये शनिवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पार पडली.या बैठकीला राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. मात्र, बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळलं होतं. त्यामुळे, पुण्यातील या डीपीडीसी बैठकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार नेहमीच शरद पवार यांच्यासमवेत स्टेज शेअर करण्याचं टाळतात. मात्र, शरद पवार अजित पवारांसमोर आवर्जून येतात, यापूर्वीही एक-दोनवेळा असे प्रसंग घडले आहेत. शनिवारी पुणे जिल्ह्याच्या नियोजन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतही शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले होते. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. तर, राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे शरद पवार हे बैठकीसाठी ५ मिनिटं आधीच सभागृहात आले होते. तर, नंतर आलेल्या अजित पवारांनी दोन खुर्च्या सोडून बसणं पसंत केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळलं.
शरद पवारांनी विचारला प्रश्न
बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्या अनुषंगाने कारवाई करा, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला होता. त्यावर, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत, त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत, कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तर, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनीही प्रश्न विचारले.
दरम्यान, शरद पवारांच्यासमोर सुप्रिया सुळें आणि अमोल कोल्हे यांच्याकडून लोकसभा सदस्यांना निधी न दिल्याची तक्रार अजित पवारांकडे करण्यात आली. मावळ लोकसभेला निधी मिळतो आम्हाला का नाही असा सवाल, अमोल कोल्हेंनी उपस्थित केला होता. त्यावर, अजित पवारांनी थेट उत्तर देण टाळलं, तर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे, डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. तर, शरद पवार स्वत: बैठकीला असल्याने सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही आत्मविश्वास बळावल्याचं दिसून आलं.