शिरुर लोकसभा : पुन्हा तोच आखाडा आणि तेच पहिलवान

Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?
Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?

#Shirur Loksabha : बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे महायूतीकडून निश्चित झाले आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत पुन्हा माजी खासदार आढळराव पाटील विरुद्ध विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची तगडी लढत रंगणार आहे. पुन्हा तोच आखाडा आणि तेच पहिलवान हे चित्र राहणार आहे. त्यानिमिताने शिरुर लोकसभा मतदार संघातही दोन राष्ट्रवादीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असून पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ ‘शिवनेरी’, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ‘वढू-तुळापूर’, ज्ञानेश्वर महाराजांनी जीवंत समाधी घेतलेले ‘आळंदी’, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ राजगुरुनगर (पूर्वीचे खेड) यांसारख्या स्थळांचा समावेश असलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला; तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील, यासाठी सर्वांचाच प्रयत्न असणार आहे.

कसा होता २०१९ पूर्वीचा मतदार संघ

सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच वर्चस्व या मतदारसंघावर होते. मात्र शिवाजी आढळराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेने या मतदारसंघावर आपला भगवा फडकवला. इतकेच नव्हे, तर मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी एकदा आणि पुनर्रचनेनंतर दोनदा असे एकूण तीन वेळा निवडून येत शिवाजी आढळराव पाटील यांनी हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते.

अधिक वाचा  आणि.. डॉ.अमोल कोल्हे हे चक्क आढळराव पाटलांच्या पाया पडले

मतदारसंघातील ४-५  विधानसभा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात असतानादेखील आढळरावांना हरविणे कठीण जात होते. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, तर लोकसभेला आढळराव, असे समीकरण  २०१९ पर्यंत शिरूरमध्ये पाहायला मिळाले.

२०१९ च्या निवडणुकीत काय घडले?

‘राजा शिवछत्रपती’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकारणाची कास धरत २०१४  मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली होती.

२०१९ च्या निवडणुकीवेळी शिवाजी आढळराव पाटलांनी टीका करताना, कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला होता. त्यावर ‘मी छत्रपतींचा मावळा’ असे प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार नाही, याची काळजी कोल्हेंनी घेतली होती. मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजानेदेखील कोल्हेंना मतदान केले होते, असं सांगितलं जातं याचाच फटका आढळरावांना बसला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकीत जातीचा मुद्दा तितकासा चालला नसल्याचे दिसून आले होते.

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. खासदार नसतानाही मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांची कामे केली असल्याचा त्यांनी दावा केलाय. मागील काही दिवसांपासून मतदारसंघात ते जोरदार ॲक्टिव्ह झाल्याचे चित्र आहे.  नुकतीच पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. यावर उत्तर देताना, “मी निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार”, असं आढळरावांनी स्पष्ट केलं आहे.

महायुतीकडून जर आढळरावांना तिकीट मिळाले, तर ‘कोल्हे विरुद्ध आढळराव’ असा सामना रंगू शकतो.“तीन वेळा संसदरत्न पुरस्कारप्राप्त खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात दिसले नाहीत; केवळ संसदेमध्ये भाषणं करुन निवडून येता येत नाही”, असा आरोप विरोधक करत आहेत. तर “खासदारांचे मुख्य काम हे दिल्लीत असते, त्यांना संसदेत जबाबदारी पार पाडावी लागते; शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत सातत्याने मांडण्याचे काम कोल्हेंनी केलं आहे”, असं कोल्हेसमर्थकांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा  दादा सोबत नाहीत म्हणून त्यांना तळ ठोकावा लागतोय : रूपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका

‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत

काही दिवसांपूर्वी मंचरमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी वळसे पाटलांवर निशाणा साधला होता.त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी मंचरमध्ये सभा घेतली होती. त्यामुळे मंचरमध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ असा कलगीतुरा रंगण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी कोल्हेंविरोधात उमेदवार उभा करुन तो निवडून आणण्याचे सुतोवाच केले होते. “शिरूर मतदारसंघात आम्ही उमेदवार देऊन तो निवडून आणणारच”, असं आव्हान अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व शिरूर लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते, आंबेगावचे आमदार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे अजित पवार गटात आहेत. खेड,आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील तिन्ही आमदार अजित पवार गटात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला येथे मोठी ताकद मिळत आहे.  शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये माजी खासदार आढळराव पाटील व विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यात चुरशीची लढत मागील निवडणुकीत झाली होती.यामध्ये डॉ.अमोल कोल्हे यांचा विजय झाला होता.

डॉ. कोल्हे यांच्या विजयामध्ये त्यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व इतरांचा मोठा वाटा होता. खेड,आंबेगाव, जुन्नर, शिरूर मधील मोठी ताकद डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे होती. डॉ. कोल्हे हे भोसरी विधानसभा मतदारसंघात मतात पिछाडीवर होते कारण भोसरी मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आढळराव पाटील यांना मताधिक्य दिले होते.

अधिक वाचा  ...अन्यथा ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी- प्रकाश आंबेडकर

दिलीप मोहिते काय करणार?

आढळराव पाटलांचे कट्टर विरोधक खेड- आळंदीचे मतदार संघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची आढळराव पाटील यांनी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही शिंदे गटाचे शिवाजी आढळराव मला भेटले म्हणजे आमचे मनोमिलन झाले, असे अर्थ काढू नका, असं दिलीप मोहितेंनी आढळरावांच्या पक्ष प्रवेशाला विरोध कायम ठेवला होता. शरद पवारांनी जे केलं तेच अजित पवार करू पाहत असतील. तर राजकारण सोडून दिलेलं बरं राहील, असं म्हणून मोहितेंनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांवर ही निशाणा साधला होता. त्यानंतर अजित पवार यांनी २० मार्च रोजी दिलीप मोहिते यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही “शिवाजीराव आढळरावांविरुद्धचा  २० वर्षांचा संघर्ष मी थांबविला, तरी कार्यकर्ते कितपत प्रतिसाद देतील याबाबत शंका आहे. दिलीप वळसे पाटील यांनी आढळरावांशी जमवून घ्यायचे ठरवले असेल तर आम्हाला काहे अडचण नाही”, असे म्हणत संदिग्धता कायन ठेवली आहे. त्यांच्या भूमिकेवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.  

शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील वेळेस डॉ.अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खरे किंगमेकर ठरले होते. जेष्ठ नेते शरद पवार यांनी मोठी ताकद लावली होती त्यांनी सभा घेतल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही झंझावात होता.यावेळी डॉ.कोल्हे यांच्यासाठी मागील निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते,अतुल बेनके आदींची मोठी शक्ती होती. यावेळी कोल्हे यांच्याकडे ही ताकद नाही अशी चर्चा आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांना या मतदारसंघात मतदार किती साथ देतात यावर डॉ.कोल्हे यांचे भवितव्य अवलंबून आहे असे बोलले जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love