पुणे(प्रतिनिधि)–मोदीजींच्या लेकींच्या नवऱ्यांना तुम्ही मारलं आहे. त्यानंतर काय होतं ही जाणीव सातत्याने त्या दहशतवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जाणवत राहील, ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव वाचल्यानंतर मला एकदम असं भरून आलं तर ‘ऑपरेशन सिंदूर’ असे या कारवाईला नाव देऊन भारताने आमच्या भावनांचा आदर केला आहे, अशा शब्दांत पहलगाम येथील दहशदवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी अनुक्रमे प्रगती जगदाळे आणि संगीता गनबोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत पंतप्रधान आणि भारतीय लष्कराचे आभार मानले.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ ठिकाणी असलेली दहशतवादी तळे हवाई हल्ला करून उध्वस्त केली. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. या पार्श्वभूमीवर पहेलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांनी त्यांच्या भावना प्रसार मध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’ नाव वाचल्यानंतर मला एकदम भरून आलं- प्रगती जगदाळे
प्रगती जगदाळे म्हणाल्या, कुंकवाचे महत्व ते प्रत्येक सुहासिनीला किती असतं हे कोणीही समजू शकत नाही. मात्र ते प्रत्येक स्त्रीला जाणवत असतं,पहलगामच्या हल्ल्यामध्ये माझं कुंकू पुसलं गेलं. त्या दहशतवाद्यांनी माझं कुंकू पुसलं, रक्ताच्या थारोळ्यात संतोष जगदाळे पडले होते ते शहीद झाले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. यातून मोदींमध्ये ही जाणीव दिसून येते की आपल्या लेकींचं सिंदूर या दहशतवाद्यांनी मिटवलं आहे. ती जाणीव त्यांनी आता दहशतवाद्यांना करून दिली आहे.
मोदीजींच्या लेकींच्या नवऱ्यांना आपण मारलं आहे. त्यानंतर काय होतं ही जाणीव सातत्याने त्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जाणवत राहील. पाकिस्तानमधील ज्या नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला केला आहे तो अत्यंत योग्य आहे. आता हा हल्ला थांबू नये प्रत्येक दहशतवादाला शोधून त्याची पाळमूळ संपवायला हवीत असेही त्या म्हणाल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’ नाव वाचल्यानंतर मला एकदम असं भरून आलं की मोदींना कसं जाणवलं असेल की ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव द्यावं? तेव्हा मला जाणवलं की आम्ही त्यांच्या मुली आहोत. मुलींचे नवरे गेल्यानंतर एका वडिलांना काय वाटू शकतं? त्यामुळे त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं आहे. मला पूर्ण खात्री होती की ते नक्की प्रत्युत्तर देणारच. ‘सिंदूर’ हा शब्द हा एका पत्नीसाठी किती जवळचा असू शकतो, तिला तिच्या आयुष्यात त्या गोष्टीचं किती महत्त्व आहे हे त्यांना जाणवलं म्हणून त्यांनी या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव दिलं त्याने माझं मन भरून आलं असेही प्रगती जगदाळे यांनी नमूद केलं.
ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत समर्पक नाव आहे- संगीता गनबोटे
संगीता गनबोटे म्हणाल्या, ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या लोकांना मारलं त्याच पद्धतीने त्यांना देखील गोळ्या घालायला हव्यात. माझ्या मिस्टरांसाठी आणि ज्यांनी ज्यांनी या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलून शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळे बुधवारचा हा दिवस आमच्यासाठी समाधानाचा ठरला आहे.
सैन्यदलाने केलेली कारवाई योग्य आहे. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा आदर केला आहे. मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेलं नाही. आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे अशा तीव्र भावना त्यांनी व्याक केल्या.
मोदींनी अत्यंत योग्य पाऊल उचचलं आहे. दहशतवादी म्हणाले होते की मोदीला जाऊन सांगा की आम्ही काय केलंय, त्याला आता मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आता पाकिस्तानला चांगला धडा मिळाला आहे. जर अजूनही त्यांनी धडा घेतला नसेल तर मोदी याहून कठोर पावलं उचलतील याची खात्री आहे,असं संगीता गनबोटे पुढे म्हणाल्या.