पुणे–कोरोनाच्या उद्रेकाने सर्वांनाच धडकी भरली आहे. या संकटाच्या काळात अनेकदा कोणाला मदत पाहिजे असली तरी ती कोणी करण्यास धजावत नसल्याच्या आणि कोरोनाच्या भीतीने माणुसकीला काळे फासणाऱ्या घटना दररोज घडत आहे. पिंपरी-चिंचवड भागात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड मधील दिघी येथे आईच्या मृतदेहाशेजारी एक दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशीच बसून होता. मात्र, या महिलेला कोरोना असण्याच्या भीतीने कोणीही या मुलाजवळ फिरकले नाही.
सरस्वती राजेशकुमार असं या महिलेचं नाव आहे. निवडणूक असल्याने तिचा पती उत्तर प्रदेशात गेला होता. ती आणि दीड वर्षाचा मुलगा दोघेच घरी होते. मात्र, तिचा मृत्यू झाला. घरात कोणीच नव्हतं. हा दीड वर्षाचा मुलगा मृतदेहासोबत खेळत होता. दोन दिवस उपाशी होता. घरात मृतदेहाशेजारी मुलगा खेळत असल्याचं पाहूनही कोणीच या मुलाला घेण्यासाठी धजावले नाही. या महिलेला कोरोना झाला असावा या भीतीने कोणीही पुढे आले नाही. अखेर दोन दिवसानंतर पोलिसांना हा प्रकार कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुशीला गबाले आणि रेखा वाजे या दोन महिला पोलिसांनी या मुलाला जवळ घेतले. त्याला दूध आणि बिस्किट दिलं. त्यानंतर या मुलाला शिशूगृहात दाखल केलं. सध्या या मुलाची प्रकृती ठिक आहे. महिलेचा पती अजूनही उत्तर प्रदेशातून आलेला नाही. मात्र, दोन दिवस उपाशी असलेल्या मुलाला कोणीही जवळ न घेतल्याने एकच संताप व्यक्त होत आहे.