पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा (आयसीएआय) ७४ वा स्थापना दिन (सीए दिन) व आयसीएआय पुणे शाखेचा हीरक महोत्सव (६० वर्षे पूर्ती) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. आयसीएआय पुणेच्या वतीने सीए सप्ताहाचे आयोजन केले असून, त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १ जुलै) वॉकेथॉनने झाले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे ध्वजारोहण झाले.
यावेळी आयसीएआयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पाठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सचिव प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, सीए व विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या सप्ताहानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सारसबाग ते आयसीएआय भवन, बिबवेवाडीपर्यंत वॉकेथॉन, पोस्टर्स बनवणे व घोषवाक्य लेखन स्पर्धा व प्रदर्शन मांडण्यात आले. शहराच्या विविध भागात रक्तदान शिबिरे यासह ‘तुमच्या आयुष्यातील एक दिवस, माझ्या नजरेतून’ या विषयावर परिसंवाद आणि सांस्कृतिक व वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सप्ताहात स्वारगेट बस डेपो येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर बॉक्स क्रिकेट लीग, शैक्षणिक साहित्य वाटप, सायक्लोथॉन, वृक्षारोपण, कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा असे विविध उपक्रम होणार आहेत. या सर्व उपक्रमांत सीए सभासदांनी सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी www.puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शाखेतर्फे केले आहे.
सीए काशिनाथ पाठारे म्हणाले, “यंदा सीए इन्स्टिट्यूट ७४ वा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. तसेच पुणे शाखेचेही हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. सर्व सीए सभासद, विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सीए दिवसरात्र एकत्र करून काम करतो. त्याच्या या कार्याच्या सन्मानासाठी वाकेथॉन, सायक्लोथॉनचे आयोजन केले. दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.”