मुंबई -27 मे रोजी झालेल्या टीव्ही डिबेटमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणी नुपूर शर्मा यांनी फॅक्ट चेकर झुबेर मोहम्मदविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्याची तक्रार नुपूर यांनी केली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीने नुपूर शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नुपूरवर इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
नुपूर शर्मा विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल, द्वेष पसरवणे आणि इतर धर्मांविरुद्ध टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ट्विटरवर दोन्ही पक्षांच्या समर्थकांकडून एकमेकांच्या अटकेचा ट्रेंड सुरू आहे. एका बाजूने नुपूर शर्माला अटक करा तर दुसरीकडून फॅक्ट चेकर झुबेरला अटक करा असा ट्रेंड सुरू आहे.
कोण आहेत नुपुर शर्मा?
नुपूर शर्मा या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. 2015 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने त्यांना उभे केले तेव्हा त्या पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या. नुपूर भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाही होत्या. 2008 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (AVBP) कडून विद्यार्थी संघटनेची निवडणूकज जिंकणाऱ्या नुपूर एकमेव उमेदवार होत्या. 2010 मध्ये विद्यार्थी राजकारण सोडल्यानंतर नुपूर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये सक्रिय झाल्या आणि मोर्चात राष्ट्रीय मीडिया प्रभारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्यांनुपूर या पेशाने वकीलही आहेत. याशिवाय त्यांनी बर्लिनमधूनही शिक्षण घेतले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सध्या देशभरात वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणाची चर्चा आहे. शुक्रवारी, 27 मे रोजी नूपूर एका राष्ट्रीय टेलिव्हिजन वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. चर्चेदरम्यान त्यांनी आरोप केला की, काही लोक सातत्याने हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहेत. असे असेल तर त्याही इतर धर्मांची खिल्ली उडवू शकतात. नुपूर यांनी पुढे इस्लामिक विश्वासांचा संदर्भ दिला होता. जो मोहम्मद झुबेरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता आणि नुपूरने पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.
झुबेरने व्हिडिओ क्लिप शेअर करताच इस्लामिक कट्टरपंथीयांनी नुपुर यांना बलात्कार आणि शिरच्छेदाच्या धमक्या देण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याला झुबेर जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘मी पोलिस आयुक्त आणि दिल्ली पोलिसांना कळवले आहे. मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना इजा होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. माझे किंवा माझ्या कुटुंबीयांचे काही नुकसान झाल्यास मोहम्मद जुबेर सर्वस्वी जबाबदार असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.