लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ दोन ट्रकचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला असून दुसर्या ट्रकचा चालक जखमी झाला आहे. या अपघातात मागील ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.
शिवा रमन रमकर्षणान कोनार (वय 52, रा. तमिळनाडू) या चालकाचा अपघातात मृत्यू झाला असून बल्लाप्पा यल्लापा अबाई (वय 30, रा. मुगाबा साव, ता. बैंल होंगल, जिल्हा बेळगाव कर्नाटक) हा चालक गंभिर जखमी झाला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्र. (TN 24 B 1670) हा पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना किमी 61/900 जवळ लेन क्र. 3 वर असलेला खड्डा न दिसल्याने त्याच्या ताब्यातील ट्रक खड्डयात गेला. यावेळी मागून आलेला ट्रक क्र. (MH 13 CU 5482) वरील चालकाला सदरचा ट्रक खड्डयात गेलेला दिसला मात्र बाजुच्या लेनवर बस असल्याने गाडी बाजुला घेता न आल्याने तो समोरील ट्रकला धडकला. यामध्ये सदर ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर सकाळी 10 वाजेपर्यत देवले पुल ते ताजे पेट्रोल पंप दरम्यान वाहतूककोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यानंतर वाहतूक पुर्वपदावर आली. दरम्यान या घटनेची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पथक या घटनेचा अधिक तपास करत आहेत.