पुणे–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील -ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी ॲड.पुनम काशिनाथ गुंजाळ (वय-२७) यांनी पोलीसांकडे मनसे कार्यकर्त्यां विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार मनसेच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेचे कार्यकर्ते प्रसाद राणे, कुमार जाधव, राजेश दंडनाईक, गजानन पाटील, सावळया कुंभार, सागर चव्हाण, सचिन काेमकर, धृवराज ढकेडकर, सुधीर लाड, निजामुद्दीन शेख यांच्यासह आणखी सहा जणांवर याप्रकरणी भादंवि कलम ३५४ (अ)(ड),५००, ३४, आयटी ॲक्ट ६६, ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कार्यकर्त्यांनी फेसबुकवर एक कराेड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप तयार केला होता. त्यावरुन तक्रारदार ॲड.पुनम गुंजाळ यांना फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांना त्या ग्रुपच्या प्रोफाईलवर ॲड.रुपाली पाटील यांचा फोटो दिसला.
विना परवानगी त्यांचा फोटो घेऊन त्याचा वापर करुन अश्लील भाषेत खिल्ली उडवली जात असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी एखाद्या महिले विषयी अश्लील भाषेत बोलू नका अशी विनंती केल्यावरही आरोपी सुधीर लाड याने व्यैक्तिक फेसबुक खात्यावरुन रुपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली. याबाबत अधिक तपास फरासखाना पोलिस करत आहे.