★ लोकमान्य टिळक हे मुख्यत: राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध असले तरी राजकारणाव्यतिरिक्त, गणित, संस्कृत, ज्योतिष, कायदा, वेदांची कालनिश्चिती, खाल्डियन वेद, सांख्य तत्त्वज्ञान, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशा अनेकविध विषयांत त्यांनी केलेले काम स्तिमित करणारे आहे. ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन द वेदाज्’ या त्यांच्या कृतींनी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.
★ गणित आणि संस्कृत हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय होते. त्यांनी कायद्याचादेखील अभ्यास केला होता, आणि या विषयाचे शिकवणी-वर्गही ते काही काळ घेत असत.
★ ‘आर्यांचे मूलस्थान’, ‘आर्क्टिक होम इन द वेदाज्’, ‘गीतारहस्य’ या ग्रंथांचे पुढे लोकमान्यांनी लेखन केले, त्याचे मूळ, संस्कृत भाषेच्या त्यांच्या व्यासंगात होते. संस्कृत विषयाच्या असलेल्या त्यांच्या सखोल अभ्यासामुळेच जर्मन तत्ववेत्ता फ्रेडरिक मॅक्सम्युलर या संस्कृतप्रेमी अभ्यासकाशी त्यांचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले होते.
★ गणिताची आवड आणि त्यात असलेली गती यामुळे टिळकांनी ‘पंचांग’ या विषयाचा अभ्यास केला. त्यासाठी ज्योतिषामध्ये संशोधन केले. त्यांच्या नावावरून छापले जाणारे ‘टिळकपंचांग’ प्रसिद्ध आहे.
★ “खाल्डियन वेद” –
मेसोपोटेमिया (म्हणजे आजचा इराक) देशात १९ व्या शतकात विटांचे काही ढिगारे सापडले (वीट = इष्टिका). त्यांच्यावर माहिती कोरलेली होती. हे इष्टिकालेख एकत्र करून प्रसिद्ध केलेले धार्मिक साहित्य ‘खाल्डियन वेद’ म्हणून प्रसिद्ध आहे. युफ्रेटिस नदीच्या मुखाजवळच्या तुराणी संस्कृतीचा हा काळ इसवी सन पूर्व ५००० च्या आसपास आहे. भारतीय #वैदिक संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व ४५०० चा असल्याचे प्रमाण टिळकांनी मांडले, आणि वैदिक आणि तुराणी संस्कृती समकालीन असल्याचे प्रतिपादन केले. अथर्ववेदाच्या ५ व्या कांडातले काही शब्द खाल्डियन वेदांतले असल्याचे त्यांनी सिद्ध केले.
★ “सांख्यकारिका” –
भारतीय तत्त्वज्ञानामधल्या, वेदांना प्रमाण मानणाऱ्या सहा दर्शनांपैकी एक म्हणजे ‘सांख्य दर्शन’. कपिलमुनी याचे प्रणेते मानले जातात. ‘सांख्यकारिका’ हा या तत्त्वज्ञानावरचा एक प्रमुख ग्रंथ ईश्वरकृष्ण यांनी लिहिला. ‘कारिका’ म्हणजे संस्कृत भाषेत विशिष्ट प्रकारे लिहिलेला श्लोक. ‘सांख्यकारिका’ या मूळ ग्रंथामध्ये ७० कारिका असल्याचा उल्लेख असला तरी, त्याच्या अनेक भाषांतरांमध्ये ६९ च कारिका आढळतात. याबाबत टिळकांनी संशोधन केले, आणि एक (बासष्टावी) कारिका गळली असल्याचे सिद्ध केले. इतकेच नाही तर तिच्या मागच्या आणि पुढच्या कारिकांचा अभ्यास करून मिळतीजुळती एक कारिका स्वत: रचली ! तर्कसंगत विचारपद्धती आणि कुशाग्र बुद्धिमत्ता ही टिळकांची वैशिष्ट्ये तर या कामात दिसलीच, पण ‘सांख्यकारिका’ ग्रंथातल्या श्लोकसंख्येबाबतचा वादही मिटायला मदत झाली.
★ “ओरायन” –
वेदांचे प्राचीनत्व सिद्ध करून वेदांचा काळ निश्चित करणारा ‘#ओरायन’ हा ग्रंथ त्यांनी इंग्लिश भाषेतून १८९३ मध्ये लिहिला. ‘मासानाम् मार्गशीर्षोsहम्’ या गीतेतल्या वचनावरून ग्रहस्थितीचा विचार करून वेदांचा काळ निश्चित करता येईल, असे त्यांना वाटले. भाषाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अशा दोन्ही प्रकारे त्यांनी विचार केला, आणि त्यांच्याआधी होऊन गेलेल्या तज्ज्ञांनी या विषयाबाबत मांडलेल्या विचारांतल्या त्रुटी शोधल्या. ग्रीक ‘ओरायन’ शब्द हा संस्कृत ‘अग्रहायण’ शब्दापासून निघाला असल्याबाबत दाखले दिले.
‘मासानाम् मार्गशीर्षोsहम्’ या वचनावरून त्या वेळी असलेली ग्रहांची स्थिती त्यांनी मांडली. पृथ्वीच्या संदर्भात ग्रहांची स्थिती त्यांच्या गतीमुळे बदलत असते. ग्रहांच्या सध्याच्या स्थितीपर्यंतचा बदल व्हायला किती काळ लागला असेल याचे गणित त्यांच्या गतीवरून करता येते. हे गणित करून टिळकांनी वेदांचा काळ निश्चित केला. आजच्या काळातल्यासारखी प्रगत साधने हाताशी नसताना, केवळ तर्क आणि गणित यांच्या आधारे हे शोधून काढणे म्हणजे फार उच्च दर्जाचे काम होते.
★ “ब्रह्मसूत्रवृत्ती” –
वेगवेगळ्या काळातील ऋषींच्या जीवनविषयक विचारांचा संग्रह उपनिषदांमध्ये आहे. या विविध उपनिषद-वचनांची मीमांसा करून त्यांचा सारांश सांगण्यासाठी रचलेल्या सूत्रांना ‘ब्रह्मसूत्रे ‘ म्हणतात. भगवद्गीतेवर भाष्य करण्याआधी पूर्वतयारी म्हणून टिळकांनी या ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केला. त्याबाबत संस्कृत भाषेत टिपणे काढली, आणि आपले विचार मांडले. या टिपणांचा आणि त्याबाबतच्या टिळकांनी केलेल्या विवेचनाचा ग्रंथ ‘ब्रह्मसूत्रवृत्ती’ या नावाने नंतर प्रकाशित करण्यात आला.
★ “गीतारहस्य” –
जीवनविषयक तत्त्वज्ञानाची मांडणी करणारी रचना म्हणून भगवद्गीता प्रसिद्ध आहे. ज्ञान, भक्ती, संन्यास हा गाभा मानत अनेकांनी गीतेचा अर्थ निवृत्तिपर लावला आहे. टिळकांनी मात्र गीतेचा अर्थ ऐहिक कर्मयोगपर लावला, आणि आपल्या जीवितकार्याचे ते नैतिक अधिष्ठान मानले. परकीयांचे सांस्कृतिक आक्रमण परतवून लावणे आणि स्वकीयांना प्रेरणा देणे या दुहेरी हेतूने त्यांनी भगवद्गीतेची निवड करून ‘#गीतारहस्य’ नावाने टीकात्मक भाष्य केले. या ग्रंथाचे उपशीर्षकही त्यांनी ‘कर्मयोगशास्त्र’ असे दिले.
★ “वैचारिक भूमिका” –
‘प्राचीन भारतीय विचार आणि परंपरा यांमुळे भारतीय मागास राहिले असून त्यांचा ऱ्हास झाला’, असे चुकीचे विचार बहुसंख्य परदेशी लोक आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्याकडून पसरवले जात. याबाबत सत्यस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे, असे टिळकांना वाटे. इतकेच नव्हे तर, एकंदरीतच, राष्ट्राच्या भविष्यकालीन वाटचालीला भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक असायला हवी, असे त्यांचे मत होते.
★ “विषयवैविध्य” –
लेखाच्या सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे गणित, संस्कृत, पंचांग ज्योतिष, कायदा, वेदांचा काळ ठरवणे, खाल्डियन वेद, सांख्य तत्त्वज्ञान, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता ही विषयांची नुसती यादीदेखील थकवणारी आणि थक्क करणारी आहे. टिळकांनी हा सगळा व्यासंग केला तो राजकारणाच्या धकाधकीतून वेळ काढून, आपणच काढलेल्या वर्तमानपत्रांचा आणि शैक्षणिक संस्थांचा व्याप सांभाळून, प्रचंड वाचन करून, आणि त्यांना तुरुंगात राहावे लागले त्या वेळेचादेखील सदुपयोग करून घेत.
★ लोकमान्य टिळकांच्या अफाट बुद्धिमत्तेला, व्यासंगाला, आणि कर्तृत्त्वाला मनापासून अभिवादन!
– समीर जोगळेकर.
९९३०३०३१९९
(लेखक संगणक अभियंता असून समाजमाध्यमांमध्ये विविध विषयांवर लिहितात.)
विश्व संवाद केंद्र, पुणे द्वारा प्रकाशित)