पुणे—उद्यापासून( घटस्थापणेपासून) प्रार्थनास्थळे भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार धार्मिक आणि प्रार्थनास्थळात प्रवेश करताना सोशल डिस्टन्सिंगसोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही बंधनकारक आला करण्यात आहे. तसेच 10 वर्षांखालील लहान मुलं आणि 65 वर्षांवरील नागरिकांना प्रवेश नसणार आहे. तर गर्भवती महिला आणि अन्य आजाराने ग्रासलेल्या नागरिकांनाही प्रार्थनास्थळात प्रवेश नसणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरं पुन्हा बंद करण्यात आली होती. पण आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरला आहे. त्यामुळं पुणे ग्रामीण परिसरातील धार्मिक स्थळं आणि प्रार्थनास्थळं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे गुरूवारपासून उघडली जाणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कोरोना लक्षणं नसलेल्या नागरिकांनाच प्रार्थनास्थळात प्रवेश असणार आहे. आत प्रवेश केल्यानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि 2 जणांत 6 फूटांचे अंतर बंधनकारक आहे. तर नागरिकांना आरोग्य सेतू अॅपचा वापरही करावा लागेल. रांगेत अंतर ठेऊन थांबणंही बंधनकारक आहे.
प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्याची व्यवस्था आणि थर्मल स्क्रिनींग आवश्यक असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. प्रतिबंधक उपाययोजनांसह नागरिकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात येणार आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळलं तर त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.