पुणे–कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाइन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभा-यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती अशोक गोडसे यांनी दिली.
ऑगमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. याकरीता ट्रस्टतर्फे एक लिंक देण्यात येणार असून त्या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्री ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.
विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत
शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. दैनंदिन धार्मिक विधी केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. भाविकांकरीता मंदिर परिसरात दोन मोठया एलईडी स्क्रिन लावण्यात येणार असून त्याद्वारे श्री चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरासमोर दोन्ही बाजूला रेलिंगची सोय करण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी या स्थानाचे महत्व अबाधित रहावे, याकरीता तेथे देखील एका एलईडी स्क्रिनची सोय करण्यात आली आहे.